नवरात्रीचा (Navratra) उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ०३ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या नवरात्री उत्सवात देवीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्त्व आहे. या दरम्यान मंडपामध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते. तसेच, व्रतवैकल्ये केली जातात. तसेच, या सगळ्यात जो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो गरबाही नवरात्रीत खेळला जातो. खरंतर, अनेक तरूणाईला गरब्याची आवड असते. मनसोक्त गरबा खेळतात. मात्र, त्यांना फक्त नवरात्रीतच गरबा का खेळला जातो? किंवा नवरात्री आणि गरबा यांचा काय संबंध आहे? याबाबत फारशी कल्पना नसते. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात नवरात्री आणि गरब्याचं विशेष नातं.
गरबा म्हणजे एक मातीचे भांडे
देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. पारंपारिक रूपात गरबा म्हणजे एक मातीचे भांडे. ज्याच्या आत एक दिवा लावण्यात येतो. ज्याला गुजराती भाषेत गरबो असे म्हटले जाते. आपण नीट बारकाईने पाहिले तर गरबा हा मातीच्या भांड्याच्या सभोवती केला जातो. ज्याला गर्भ दिप असं म्हटले जाते.पूर्वी हे भारतातील गुजरात आणि राजस्थान सारख्या पारंपारिक ठिकाणी खेळले जात होते. परंतु हळूहळू त्याची लोकप्रियता वाढली आहे. गरबा या शब्दाकडे लक्ष दिले तर हा शब्द गर्भ आणि दीप यांनी बनलेला आहे. या दिव्यालाच गर्भदिप म्हणतात.