आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा निर्धार असल्याचा आमदार नितेश राणेंचा आरोप
कणकवली : काँग्रेस पक्षाची भारत देशात सत्ता आली तर काँग्रेस आरक्षण व्यवस्थाच संपवून टाकणार असे वक्तव्य विरोधी पक्षनेता व काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे, तो संपवून टाकण्याचा निर्धारच राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण घालवू देणार नाही. म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून आम्ही ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे विधानसभा क्षेत्रासाठीची भव्य आरक्षण बचाव रॅली काढणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते ,आमदार नितेश राणे यांनी दिली.
येथील प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, राहूल गांधींचे वक्तव्य हे संविधानाने एससी, एसटी, एनटी वा इतर समाजाला जो आरक्षणाचा हक्क दिलेला आहे, तो संपुष्टात आणण्याचा निर्धार केलेला दिसतो. आरक्षण संपविण्याचे काम राहूल गांधी व काँग्रेसकडून होईल असे दिसून येते. आम्ही याला विरोध करणार असून काही झाले तरी भारत देशातील आरक्षण घालवू देणार नाही, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. जानवली पुलाकडून ही रॅली सुरू होणार आहे.
लोकसभा निवडणूकीच्या वेळी विरोधकांकडून अपप्रचार
लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळी चूकीच्या पद्धतीने प्रचार करून पंतप्रधान संविधान विरोधी म्हणून काहींनी प्रचार केला. पंतप्रधानांनी तसे कोणतेही वक्तव्य केलेले नसतानाही जे कुणी बोललेही नाही वा कुणाच्या मनातही नाही, ते खोटे पसरविण्याचे काम करण्यात आले होते. समाजात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता तर आरक्षण संपविण्याची भाषा राहूल गांधी यांनी स्वतःच केली असून यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकणार? म्हणूनच याला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आमदार राणे यांनी केले.