अहमदनगर : एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदा येथील महिलेच्या पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच सदर पोलीस हवालदाराला तात्काळ निलंबित करण्याची मागणी पिडीत पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अन्यथा २७ सप्टेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुलांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात पिडीत पतीने म्हटले आहे की, या घटनेमुळे घरातील लहान मुले आईच्या प्रतिक्षेत असून, त्या पोलीस कर्मचाऱ्यास संपर्क साधला असता तो शिवीगाळ करुन धमकावत असल्याचा आरोप तक्रारदार आव्हान काळे यांनी केला आहे.
तक्रारदार काळे श्रीगोंदा तालुक्यात दोन मुले व एक मुलगीसह आपल्या पत्नीबरोबर राहत होते. मात्र कर्जत पोलीस स्टेशन येथील एका पोलीस कॉन्स्टेबल आपल्या पत्नीला घेऊन गेला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झाले असून, मायलेकरांची ताटातूट झाली आहे. तो पोलीस वर्दीचा गैरफायदा घेऊन धमकी देऊन शिव्या देत आहे.
सदर पोलिसाला पहिली पत्नी असून, मुले देखील आहेत. पहिली पत्नी असताना त्याने दुसरी पत्नी घेऊन जाऊन लग्न केले असे तो म्हणत आहे. खाकी वर्दीचा गैरफायदा घेऊन तो पोलीस अन्याय करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.