मुंबई : विधानसभेत निवडून आलेल्या आमदाराचा अग्रलेखात उल्लेख “बाल, “कु. नितेश”, “चिमखडे बोल” अशा शब्दात करणे म्हणजे एकांगी कल्पनाविलास आहे, असे स्पष्ट करत माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी लोकसत्ता दैनिकातील अग्रलेखावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
२३ सप्टेंबर २०२४ रोजीचा दैनिक लोकसत्ताच्या ‘कर्मभूमीतील धर्मसंकट’ या मथळ्याखालील अग्रलेखात माझा व माझ्या मुलाचा उल्लेख केला असल्याने आपण पत्र लिहित असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
हा अग्रलेख म्हणजे सुरम्य कल्पनाविलासाचा नमुना असून यात उपहासाचाही उपयोग केला आहे. ४२ वर्षाच्या प्रगल्भ, विधानसभेवर निवडून आलेल्या आमदाराचा उल्लेख आपण “बाल, “कु. नितेश”, “चिमखडे बोल” अशा शब्दात केला आहे. निवडणुक आयोगाच्या सौजन्याने पंतप्रधानांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अधिक वेळ मिळेल हा एक कल्पनाविलासाचा भाग आहे. अजितदादा यांच्याकडून कु. राणे याच्याविरोधात श्रेष्ठीकडे तक्रार केली असल्याची माहिती दिली जाते’ हा सुध्दा कल्पनाविलासाचा नमुना आहे, असे पत्रात नमूद केले आहे.
या अग्रलेखामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाचाही उल्लेख केला आहे. लोकसभा निकालांमध्ये काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि (राष्ट्रवादी शरद पवार) यांच्या बाजूने मुस्लिम मतदारांनी एकगठ्ठा मतदान केले, याबद्दल मात्र आपण ब्र सुध्दा उच्चारलेला नाही. हिंदुत्व हा भारतीय जनता पक्षाचा आत्मा आहे. हिंदुत्वाचे रक्षण करणे व हिंदू विरोधी प्रवृत्तींना आळा घालणे हे आमचे कर्तव्यच आहे. तुम्ही मात्र एकांगी कल्पनाविलासातून हिंदू विरोधी भूमिका मांडत राहणार आहात. हा काही कल्पनाविलास नाही तर तुमचा इतिहास आहे, याकडे नारायण राणे यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे.
अग्रलेखात दिलेली माहिती कोणाकडून याचा काहीही उल्लेख नाही. ‘ही सारी तयारी आहे अजितदादा यांनी महायुतीतून प्रस्थान ठेवावे याची’ हा संपूर्ण परिच्छेद कल्पना विलासाचे इमल्यावर इमले चढवितो. वर्तमान पत्राच्या भाषेत याला टेबल न्युज म्हणतात.तुमच्या कडून तरी दुसरी कसली अपेक्षा ठेवावी? बाकी अग्रलेख व आपल्या स्तंभातून दारूचे गोडवे गाणा-याकडून कल्पनाविलासाचे इमलेच उभे राहणार आहेत, असेही नारायण राणे यांनी नमूद केले आहे.