राजकुमार जाधव
शिर्डी : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून पक्षांतर्गत फोडाफोडीचे राजकारणाला सुरुवात झाली आहे. दिग्गज नेत्यांना तिकीट मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने दुसऱ्या पक्षांकडे चाचपणी सुरू झाली आहे. यामध्ये दिग्गज नेतेही मागे नाहीत. राज्यात सर्वात मोठा आणी सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील नेते महाविकास आघाडीतील शरद पवार गटात जाण्यासाठी जास्त इच्छुक असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच आता भाजपला मोठा धक्का देणारी नगर जिल्ह्यातून बातमी आली आहे.
दरम्यान अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमधील पूर्वाश्रमीचे दिग्गज नेते तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभवराव पिचड सध्या भाजपात आहेत. मात्र पितापुत्राची ही जोडी लवकरच तुतारी हाती घेतील अशी चर्चा सुरू झाली आहे. मधुकर पिचड आणि वैभवराव पिचड या दोघा पितापुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत सुमारे अर्धा तास चर्चा केली. या भेटीची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून पिचड पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात येतात का? याविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे.
आगामी विधासभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. जागावाटपात अकोले विधानसभेची जागा अजित पवार गटाला जाण्याची दाट शक्यता आहे.अशा परिस्थितीत आपल्याला भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नाही असा अंदाज माजी आमदार वैभव पिचड यांना आला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शरद पवार गटाला जाण्याची शक्यता आहे.सध्या या मतदारसंघात अजित पवार गट राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचं पारडं जड आहे. या बदलत्या राजकारणामुळे पिचड पितापुत्र पुन्हा घरवापसी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असले तरीदेखील दोन महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी अकोले येथे स्व. अशोकराव भांगरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा मुलगा अमित भांगरे यांना ताकद द्या असे आवाहन त्यांनी केले होते. याचा अर्थ अकोले मतदारसंघात विधानसभेसाठी अमित भांगरेचे टिकीट फिक्स असा निकष लावण्यात आला होता. मात्र आता पुन्हा पिचड पितापुत्रांच्या भेटीमुळे शरद पवार आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी सन २०१९ मध्ये मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. मात्र यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचडांना पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे यांना लॉटरी लागली होती. पिचडांच्या भेटीपुर्वी भाजपच्या कोल्हे यांनी देखील पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २०१९ ची पुनरावृत्ती करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकंदरीतच लोकसभेला ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने दोन्ही जागा जिंकून महायुतीचे उमेदवार पराभूत केले त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत नगरमध्ये महाविकास आघाडी बाजी मारणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.