सखल भागात पाणी; रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली
मुंबईत पावसाचा रेड अलर्ट
मुंबई : मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी मुंबई उपनगरात जोरदार हजेरी लावली. दिवसभर उघडझाप करीत असलेला पाऊस संध्याकाळी जोरदार बरसला. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, गोवंडी, अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरीवली या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी देखील भरले.
मुंबईत परतीच्या पावसाने बुधवारी सायंकाळी जोरदार कोसळत मुंबईकरांना झोडपून काढले. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते तर अधून मधून पावसाची रिपरिप सुरु होती. तर सायंकाळी साडेपाच नंतर पावसाने संततधार सुरु ठेवत पाऊस जोरदार बरसला. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूकीवर परिणाम झाला. रेल्वे व रस्ते वाहतूक मंदावल्याने प्रवाशांचे हाल झाले. हवामान विभागाने गुरुवारी मुंबईत पावसाचा रेड अॅलर्ट जाहिर केला आहे. सकाळी ८.३० पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत जून महिना पावसाविना गेला. मात्र जुलै महिन्यातील १५ दिवस धो धो पडलेल्या पावसाने जून महिन्याची कसर भरून काढली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही अधून मधून समाधानकारक पाऊस पडल्याने मोठा दिलासा मिळाला. मुंबईला पाणी पुरवठा करणारी तलावांतही पुरेसा पाणीसाठा जमा झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई व उपनगरांत मागील दोन- तीन दिवसांपासून पावसाने अधून मधून रिपरिप सुरु केली आहे.
बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण करीत सायंकाळी पाच नंतर जोरदार बरसायला सुरुवात केली. याचवेळी अनेकांची कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने चाकरमानी व कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची धावपळ उडाली. रेल्वे स्थानके, बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. प्रचंड गर्दीत प्रवास करीत अनेकांनी घर गाठले. जोरदार पावसामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक मंदावल्याने प्रवाशांचे हाल झाले. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. जोरदार पावसाच्या इशा-यानंतर मुंबई महापालिकेने पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
मुंबई आणि उपनगरातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरातील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सकाळी 8.30 वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (26 सप्टेंबर) सकाळी 8.30 पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कुर्ला, चेंबूर – शेल कॉलनी, विक्रोळी, दादर टीटी, अंधेरी सबवे, मानखुर्द, वडाळा, वांद्रे, मालाड, कांदिवली, लालबाग -परळ, गोरेगाव, टिळक नगर, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, विद्याविहार आदी सखल भागात पाणी साचले.
जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज
कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याच्या प्रभावामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र व लगतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि मुंबईत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मागील दोन दिवस कमाल तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, आता पुढील आठवड्यात अपेक्षित पावसानंतर तापमानात काही अंशी घसरण होण्याची आणि उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.