भिवंडी : शासकीय महसूल यंत्रणेतील शेवटचा महत्त्वाचा घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोतवाल या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर कोतवाल संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू आहे. भिवंडी तालुक्यातील ३० कोतवालांनी मंगळवार २४ सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू करीत या आंदोलनात सहभाग घेत भिवंडी तालुका कोतवाल संघटना अध्यक्ष नारायण पाटील,सचिव लक्ष्मण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार चंद्रकांत राजपूत यांच्या कडे सुपूर्द केले. राज्यातील कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी बहाल करावी,शिपाई संवर्गात पदोन्नतीचा ४० टक्के कोटा रद्द करुन ८० टक्के करावा,कोतवाल यांना सेवानिवृत्त वेतन १० हजार किंवा निर्वाह भत्ता म्हणून १० लाख रुपये देण्यात यावे, दरमहा १५०० रुपये प्रवास भत्ता मिळावा, कोतवाल यांना तलाठी व तत्सम पदभरतीमध्ये १० टक्के आरक्षण मिळावे, कोतवाल यांना अर्जित रजा रक्कम ३०० दिवस वाढविण्यात यावी, कोतवाल कर्मचारी यांना इतर शासकीय कर्मचा-याप्रमाणे वारसांना अनुकंपा लागु करावे,महिला कोतवालांना राज्यातील इतर शासकीय महिला कर्मचाऱ्यां प्रमाणे प्रसुती रजा व बालसंगोपन रजा मिळावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
भिवंडीत कोतवाल संघटनेचे बेमुदत आंदोलन