गांधीनगर: गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात एका भीषण रस्ते अपघाताची बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमध्ये प्रवास करणारे लोक श्यामला जी मंदिराचे दर्शन करुन अहमदाबादला परतत होते. त्यावेळेस ही कार पाठीमागून ट्रकमध्ये घुसली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाला आहे.
अपघातानंतर कारमधील लोकांना मोठ्या मेहनतीने बाहेर काढण्यात आले. कारला कटरने कट करून त्यांना बाहेर काढण्यात आले. कारच्या आत एकूण ८ प्रवासी प्रवास करत होते. यात एका व्यक्तीला वगळता इतर ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.
कारच्या चिंधड्या उडाल्या
अपघातानंतर कारची स्थिती पाहून अंदाज लावता येतो की कारचा स्पीड खूपच होता. ट्रकमध्ये घुसल्याने कारच्या चिंधड्या उडाल्या आहेत. कारच्या आतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना कटरचा वापर करावा लागला.
या अपघातात जीव गमावलेले सर्वजण अहमदाबाद येथे राहणारे होते. हा अपघात सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.