दीपक मोहिते
मुंबई : राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. १५ दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक पिके धोक्यात आली आहेत. तर शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. दरम्यान हवामान विभागाने उद्या ऑरेंज व परवा रेड अलर्ट जाहीर केला आहे. हा परतीचा पाऊस असून तो यंदाही शेतीला फटका देणारा ठरणार आहे, अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
गेल्या काही वर्षापासून राज्यात पर्जन्यमानाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. पावसाचे आगमन उशीराने होणे, मध्येच पावसाचे गायब होणे व शेती बहरल्यानंतर जाता जाता पिकांना फटका देणे, असे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. मात्र यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाले, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेगाने हातावेगळी केली. त्यानंतर सलग १५ ते २० दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने काढता पाय घेतला. त्यामुळे आवणी व लावणी इ. कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली.
सध्या कापणीची कामे सुरू असताना, अचानक पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे आज शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ झाली. काल रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यात शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. उद्या आणि परवा, अशा दोन दिवशी हवामान विभागाने अलर्ट दिल्यामुळे शेतकरी आता भितीच्या सावटाखाली आले आहेत.