अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकासाचे सोमवारी निघणार टेंडर
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : मुंबईतल्या हजारो इमारतींच्या पुनर्विकासाचा आणि दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. येत्या सोमवारी काळाचौकी येथील अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचे टेंडर निघणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. इमारतींच्या विविध प्रश्नांबाबत डॉ. शिंदे यांनी आज वांद्रे पूर्व इथल्या म्हाडा मुख्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना जनसंवाद दौऱ्यात खासदार डॉ. शिंदे यांनी नुकताच वरळी, भायखळा, शिवडी, जोगेश्वरी, वांद्रे यांसह विविध मतदारसंघातील नागरिकांच्या भेटी घेतल्या होत्या. या दरम्यान वरळीतील बीडीडी चाळ, कोळीवाडा, पोलीस वसाहत यांसारख्या अनेक इमारतींचा आणि चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न रखडला असल्याचे निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर म्हाडा मुख्यालयात म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
मुंबईत अनेक वर्ष रखडलेल्या वरळी, शिवडी-लालबाग,वांद्रे पूर्व आणि भायखळा या विभागातील विविध इमारतींच्या पुर्नविकासाचा प्रश्न या बैठकीत मार्गी लावण्यात आला. बहुचर्चित अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचे प्रलंबित टेंडर ही येत्या सोमवारी काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या पुनर्विकासातून २५ हजार रहिवाश्यांना हक्काच्या अत्याधुनिक सुविधाजनक सदनिका मिळणार आहेत.
याबरोबरच वरळी, शिवडी भायखळा आणि वांद्रे पूर्व इथल्या म्हाडा, एसआरए आणि पीएमजीपी इमारतींचा पुनर्विकास आणि दुरुस्तीच्या कामांनाही यावेळी मंजुरी घेण्यात आली आहे. वांद्रे आणि वरळी इथल्या सुमारे १४०० इमारतीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात यावर कोणतेही काम झाले नसल्याचा ठपका ठेवत शिंदे यांनी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
गोवर्धन इमारत, पंचगंगा इमारत आणि इराणी चाळीचा पुनर्विकास क्लस्टर अर्थात सामूहिक विकास करण्याची मागणी होती यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. नळवाला चाळीतल्या भाडेकरुंसाठी असलेल्या घरांच्या सोडतीच्या प्रश्न प्रलंबित होता. त्याचीही सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. त्याचबरोवर शिवशक्ती इमारतीतल्या रहिवाश्याच्या अभय योजनेबाबतही म्हाडा तयार असल्याचेही यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. पीएमजीपी इमारतीच्या दुरुस्तीसाठी सरकारने याआधी १५० कोटींची मान्यता दिली आहे. याच बरोबर भायखळा येथे २५ पीएमजीपीच्या इमारती असून त्यांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी म्हाडाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. ७५ आरटीच्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी म्हाडा निधी देणार असल्याचे यावेळी त्यांनी केले. .
विविध प्रकल्पांद्वारे मुंबईपासून दुरावलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत जे प्रश्न सुटण्यासारखे होते ते आधीच्या सरकारने सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक ट्रान्झिट कॅम्पमध्ये १३ चौदा वर्ष लोक दयनीय अवस्थेत राहत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे सांगत डॉ श्रीकांत शिंदे यांनी उबाठावर टीकेची झोड उठवली. मात्र आगामी काळात मुंबईचे चित्र पालटणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.