मुंबई : मराठी सिनेसृष्टीमधील (Marathi Movie) दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा २ (Navra Maza Navsacha 2) या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. “नवरा माझा नवसाचा २” चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६०० पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. वीकेंडला ७. ८४ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवादलेखन संतोष पवार यांचं आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar), अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar), महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे.
बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये “नवरा माझा नवसाचा २” हा चित्रपट चर्चेत राहिला आणि त्याचंच प्रतिबिंब बॉक्स ऑफिसवरही (Box Office Collection) उमटत आहे. चित्रपटावरचं प्रेम प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिसादातून दाखवून दिलं आहे. आता येत्या काही दिवसांत हा प्रतिसाद आणखी वाढेल यात शंका नाही.