नेमके कारण काय?
अमरावती : आकृतीबंधाचा अंमलबजावणीसह महसुल स्तरावरील बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी (RTO Employees) संघटनेने आजपासून बेमुदत संपाची (Strike) हाक दिली आहे. या संपामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे.
मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर यांनी सांगीतले, मोटार वाहन विभागासाठी शासनाने सुधारीत आकृतीबंध २३ सप्टेंबर २०२२ पासून लागू केले. परंतू त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या. आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी न करता त्याचा आधार घेऊन महसूल विभागस्तरावर बदल्या करण्याची सुत्र शासनाने स्विकारली आहेत. त्यामुळे ३१ ऑगस्ट २०२४ रोजी महसूलस्तरावर बदल्या करण्यात आल्या. या बदल्या मान्य नसल्याने कर्मचाऱ्यांनी न्यायालयात (मॅट) दाद मागून त्यावर स्थगिती आदेश पारीत केला आहे.
आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ होत असल्यामुळे व महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जात आहे. या संदर्भातील निवेदन वरिष्ठांना देण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयातील चतुर्थ व तृतीय श्रेणीतील शेकडो कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होणार आहे. त्यामुळे वाहन नोंदणीपासून ते लायसन्सची सर्व कामे प्रभावित झाल्याचे दिसून येत होते.