कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ उभी केली. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. ही चळवळ पुढे नेण्याचे कार्य त्यांचे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील करीत आहेत, त्यांच्यावर राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्याचे दौरे करून एक लाख मराठा युवकांना उद्योजक करण्याचे ऐतिहासिक व उल्लेखनीय असे कार्य केले. ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे आणि मराठा आरक्षण मागणीचे जनक, माथाडी कामगारांचे भाग्यविधाते / आराध्यदैवत देवतुल्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!!
भारतीय कामगार चळवळीच्या देदीप्यमान इतिहासात माथाडी कामगार चळवळीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण माथाडी कामगारांचे भाग्यविधाते कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या अथक परिश्रमाने तसेच जिद्द आणि चिकाटीने महाराष्ट्रातील माथाडी कामगार चळवळीला इतिहासात “न भुतो न भविष्यती” असे अढळ स्थान प्राप्त झाले आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर माथाडी कामगारांची चळवळ अभेद्य एकजुटीने कार्यरत आहे. माथाडी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी अविरत संघर्षाच्या माध्यमातून माथाडी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आजही अण्णासाहेबांची संघटना लोकशाही मार्गातून संघर्ष करण्यासाठी सदैव सज्ज असते. कारण अण्णासाहेबांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार माथाडी कामगार संघटनेचे नेते, माथाडी कामगार-कार्यकर्ते सत्तेच्या परिवर्तनाला आणि त्यातून होणाऱ्या माथाडी कामगारांवरील अन्यायाला एकजुटीने सामोरे जात असतात.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे हे अण्णासाहेबांचे मूळ गाव, तत्कालिन काळात कोणत्याही सोयी-सवलतीचा अभाव असलेला ढेबेवाडीचा परिसर, अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी अण्णासाहेबांसारखा तरुण जिद्दीने पेटून उठला आणि मनाशी निश्चय केला की, आपण या प्रतिकुल परिस्थितीला शह दिलाच पाहिजे. याच ईर्ष्यने अण्णासाहेब सज्ज झाले आणि स्वतःचे शिक्षण अपुरे ठेऊन उदरनिर्वाहासाठी त्यांनी मुंबईसारख्या शहराकडे आपले ध्येय सिद्ध करण्यासाठी वाटचाल केली. मुंबईत आल्यानंतर त्यांनी पोर्टट्रस्टमध्ये क्रेन ऑप्रेटरची नोकरी पत्करली पण नोकरीवरून येताना व परत जाताना त्या परिसरातील डोक्यावरून ओझी वाहून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या हमाल वर्गाची दयनीय अवस्था पाहून अण्णासाहेब पाटील यांचे काळीज कातरले. अन्याय, अत्याचार, श्रमाचा योग्य मोबदला न मिळणे, आर्थिक पिळवणूक, अहोरात्र काम अशा दुष्टचक्रात तत्कालिन हमाली करणाऱ्या कामगारांचे आयुष्य दिशाहीन झाले होते आणि म्हणूनच अण्णासाहेब पाटील यांनी अहोरात्र मेहनत करणाऱ्या मस्जीद बंदर परिसरातील व मुंबईतील हजारो कामगारांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात लढण्यासाठी संघटित केले. या कामगारांसाठी सरकारच्या माध्यमातून त्या काळात कोणतेच कायदे उपलब्ध नव्हते याचीही जाणीव कामगारांना ठिकठिकाणी सभा आयोजित करून दिली व महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची स्थापना अॅडव्हाेकेट काशिनाथ वळवईकर यांच्या सहकार्याने केली. विशेष म्हणजे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ऐतिहासिक असे संघर्षमय लढे उभारले व तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या सरकारला हमालीचे काम करणाऱ्या त्रस्त कामगारांच्या धगधगत्या वास्तवाची जाणीव करून दिली. यामुळेच सरकारने “माथाडी अॅक्ट, १९६९” या ऐतिहासिक माथाडी कामगार कायद्याची निर्मिती केली.
अण्णासाहेब इथवरच थांबले नाहीत, तर विविध क्षेत्रांत हमालीचे काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध माथाडी मंडळे स्थापन करण्यास सरकारला भाग पाडले व या कामगारांना त्यांनी “माथाडी कामगार” अशी सन्माननीय आणि समाजाभिमुख अशी सन्मानपूर्वक पदवीही मिळवून दिली, माथाडी कायदा व विविध माथाडी मंडळांच्या माध्यमातून कामाचे योग्य दाम व इतर सोयी-सवलती उपलब्ध करून कष्टकऱ्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देण्याचे महान कार्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी केले. विशेष म्हणजे अण्णासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या नेते व कार्यकर्त्यांनी माथाडी कायदा व माथाडी कामगारांच्या रोजगारावर येणाऱ्या संकटांना धैर्याने परतवून लावले. सन १९९० साली आपल्या देशात खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या त्रिसुत्रीने शिरकाव केला. या सरकारी धोरणाची देशातील लाखो उद्योगांना झळ सोसावी लागली, लाखो उद्योग बंद पडले आणि लाखो कामगार बेरोजगार झाले. मात्र अण्णासाहेबांच्या कामगार संघटनेने आणि नेत्यांनी माथाडी कामगार क्षेत्रात सरकारच्या खाऊजा धोरणाला शिरकाव करण्यापासून वेळीच रोखले. त्यामुळे लाखो माथाडी कामगारांच्या नोकऱ्या अबाधित राहिल्या, तर त्यानंतर गेल्या दोन दशकांमध्ये अनेक कायद्यांमध्ये केंद्र सरकारने बदल केला. त्यामुळेही बेरोजगारीमध्ये लाखोंची भर पडली. कायद्यांतील बदलांमुळे अनेक कामगार न्यायापासून वंचित राहिले पण अण्णासाहेबांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक माथाडी कामगार कायद्यात बदल होऊ नये म्हणून संघटना सतत जागृत राहिली. आझाद मैदानावरील उपोषण आंदोलन ते विधिमंडळापर्यंत माथाडींचा बुलंद आवाज पोहोचविण्याचे काम सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप या नेत्यांनी केले. आजही अण्णासाहेबांनी निर्मिती केलेला ऐतिहासिक माथाडी कायदा सुरक्षित ठेवण्यासाठी संघटनेचे नेते व कार्यकर्ते आटोकाट प्रयत्न करीत आहेत. अण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या संघटनेची वाटचाल सुवर्ण महोत्सवाकडून अमृत महोत्सवाकडे होत असून या काळात विविध पक्षांची सत्ता महाराष्ट्रात आली पण या जगविख्यात माथाडी कायद्यात बदल करण्याचे डावपेच काही सरकारने केले अशा परिस्थितीत संघटनेचे नेते-कार्यकर्ते आणि माथाडी कामगार सतत सतर्क आहेत.
विशेष म्हणजे अण्णासाहेबांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव कै. शिवाजीराव पाटील यांनी संघटनेचे कार्य अण्णासाहेबांच्या शिकवणुकीनुसार त्याच तडफेने केले तर शिवाजीराव पाटील यांच्या निधनानंतर संभाजीराव पाटील यांनी संघटना आणि संघटनेचे कार्य अबाधित ठेवण्याचे मोलाचे काम केले. संभाजीराव पाटील यांच्या निधनानंतर अण्णासाहेबांच्या संघटनेचे नेतृत्व त्यांचे सुपुत्र व सरचिटणीस, माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील आणि त्यांचे सहकारी कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप हे करीत असून, त्यांनी माथाडी कामगारांची एकजूट आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आशिया खंडात नावाजलेली अण्णासाहेबांची संघटना अभेद्य ठेवली आहे आणि ही नेतेमंडळी सरकारच्या विविध खात्यामध्ये आपल्या कर्तृत्वाने झळकतही आहेत. आजच्या अण्णासाहेबांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कर्तृत्वाचाही आढावा घेणे उचित ठरेल. आमदार म्हणून अण्णासाहेबांनी विधिमंडळात माथाडी कामगारांचे विविध प्रश्न उपस्थित करून माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिलाच पण त्याचसोबत माथाडी कामगारांसाठी विविध कल्याणकारी संस्थाही निर्माण केल्या. यामध्ये माथाडी सहकारी पतपेढी, ग्राहक संस्था, माथाडी हॉस्पिटल अशा संस्था निर्माण केल्या. ऐवढेच नव्हे तर दूरदृष्टीने अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील मराठा बांधवांना एकसंध करण्याचे कामही केले व या महासंघातर्फे मराठा समाजाला विविध क्षेत्रात सुविधा मिळवून देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीची मुहूर्तमेढ अण्णासाहेबांनीच रोवली, त्या काळात त्यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण मिळावे यासाठी अनेक लढे उभारले. आर्थिक निकषांवर आरक्षण दिल्यास राज्यात व देशात भावी काळात होणारे विपरीत परिणाम रोखता येतील ही सुद्धा भविष्यसुचक जाणीव तत्कालिन राज्यकर्त्यांना त्यांनी करून दिली होती, पण बाबासाहेब भोसले यांच्या तत्कालीन सरकारने ते मान्य केले नाही; म्हणून त्यांनी अॅड. शशिकांत पवार व इतरांच्या सहकार्याने “चलो विधान भवन” या भव्य मोर्चाचे मुंबईत दि.२२ मार्च, १९८२ रोजी आयोजन केले व सरकारला जागृत करण्याचे प्रयत्न केले पण सरकारने आपला हेका काही सोडला नाही. त्या भव्य मोर्चासमोर त्याचे सूचक उद्गार होते की, आमची मागणी मान्य झाली नाही, तर “उद्याचा सूर्योदय मी पाहणार नाही” आणि झालेही तसेच म्हणून दि.२३ मार्च, १९८२ रोजी अण्णासाहेबांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. म्हणूनच अशा या महान कामगार आणि सामाजिक चळवळीतल्या नेत्याला मानवंदना देण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून नवी मुंबईतील भव्य मेळाव्याला हजारो कामगार मोठ्या संख्येने दरवर्षी उपस्थित राहतात. हेच खरे अण्णासाहेबांच्या ऐतिहासिक कार्याचे द्योतक आहे.
पोपटराव रामचंद्र देशमुख
संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, मुंबई