मुंबई : सध्या सणासुदीचा काळ सुरु असून अशातच सर्वसामान्यांना महागाईची (Inflation) झळ सोसावी लागत आहे. भाज्यांचे दर कडाडले (Vegetables Price Hike) असताना मागील आठवड्यात खाद्यतेलांचा (Food Oil) भडका उडाला. अशातच नवरात्री, दिवाळी, दसरा या सारख्या सणांच्या कालावधीत प्रत्येक घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. मात्र यासाठी लागणाऱ्या सुका मेवाचे (Dry Fruits) दरही वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणांच्या काळात गृहीणींचे बजेट कोलमडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी उत्सव जवळपास महिनाभरावर आली असताना दिवाळीत खाद्यतेलांसह सुका मेवा आणि इतर वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ होते. परंतु खाद्यतेलांवरील आयात शुल्कात २० टक्के वाढ केल्याने गेल्या आठवडाभरापासून खाद्यतेलांच्या दरांत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच खोबरे, जायफळ, शहाजिरे, मखाणा, काजू आदी वस्तूंच्याही दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत दरांत अधिक वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
काय आहेत घाऊक बाजारातील दर?
खाद्यतेल (प्रति १५ किलो)
- सूर्यफूल – २०२५
- सोयाबीन – २०९०
- शेंगदाणा – २७००
इतर पदार्थ
- खोबरे २८० रुपये
- मखाणा १६०० रुपये
- काजू ९५० रुपये
- शहाजिरे १००० रुपये
- खोबरे किस ३०० रुपये