पुणे : राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपाने दावा केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही (NCP) पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघावर दावा ठोकला आहे. पक्षाच्या झालेल्या मासिक बैठकीमध्ये याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारिणीची मासिक बैठक खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, शहर कार्याध्यक्ष फजल शेख पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे. तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार आहे. त्याव्यतिरिक्त भोसरी व चिंचवड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे. त्यामुळे चिंचवड व भोसरी विधानसभा हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावेत, असा ठराव शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला. त्या ठरावाला महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनी अनुमोदन दिले.
या ठरावामुळे आता निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय चर्चांना उत आला असून महायुतीत देखिल कलगीतुरा रंगला आहे.