Tuesday, October 8, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअमेरिकेतील भारतीय मोदींच्या भाषणाने प्रभावित

अमेरिकेतील भारतीय मोदींच्या भाषणाने प्रभावित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिकेतील भाषणातून इंडियन डायस्पोर (अमेरिकेतील भारतीय)ला आकर्षित करून घेतले. त्यांनी भाषणाच्या वेळेस मोदी यांच्या समर्थनार्थ विशेषतः भारतीय महिलांनी मोदी, मोदी यांचा जो जयघोष केला तो मोदी यांच्या लोकप्रियतेची चुणूक दाखवणारा तर होताच पण मोदी यांनी भारताला किती जागतिक देशांच्या रांगेत आणून बसवले आहे, याचे प्रत्यंतर आणणारा होता. मोदी, मोदी अशा घोषणांच्या गदारोळात न्यूयॉर्कमधील भाषणात मोदी यांनी भारतीय लोकांना प्रभावित करतानाच भारताचे आजच्या आंतरराष्ट्रीय जगतातील महत्त्वही अधोरेखित केले. मोदी यांनी म्हटले की, मी देशासाठी आपले जीवन देऊ शकणार नाही पण मी देशासाठी प्राण कुर्बान करायला तयार आहे. त्यांच्या या वाक्याने त्यांची देशाप्रति असलेली निष्ठा व्यक्त होतेच पण मोदी यांच्यामागे देश का आहे याचेही स्पष्टीकरण मिळते. मोदी म्हणतात की, मी पहिला पंतप्रधान आहे की जो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्मला आहे. मोदी यांनी म्हटले की, कोट्यवधी लोकांनी भारतासाठी प्राण दिले आहेत पण आम्ही सारे जीवन देशासाठी त्यागण्यास तयार आहोत. मोदी यांच्याच काळात देश तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता झाला.

देशाने प्रचंड प्रगती केली आणि ज्या ज्या क्षेत्रांत अमेरिका आहे त्या क्षेत्रात भारतही मागे नाही. चांद्रयान असो की जी-२० शिखर परिषद असो, भारताने यशस्वी आयोजन करून अमेरिकेपेक्षा तसूभरही कमी नाही हे दाखवून दिले आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय लौकिक वाढत असतानाच भारताने आर्थिक बाबतीत मैलाचा दगड गाठला आहे आणि भारताने तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता म्हणून झेप घेतली आहे. तीही इंग्लंडसारख्या देशाला मागे टाकून. त्यामुळेच भारताची दखल अमेरिकेसारख्या देशाला घ्यावी लागली आहे. जो देश हत्ती आणि सापांचा देश म्हणून ओळखला जात होता त्या देशाने केलेली प्रगती मोदी यांनी देशाला दिलेली भेट आहे हे निःसंशय. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय समाजाची प्रशंसा केली ती त्यांच्या आपल्या कार्यक्षेत्रातील कर्तृत्वाची दखल घेऊन. पण मोदी यांनी भारतीय जनमानसाबद्दल जे गौरवोद्गार काढले ते कालच्या प्रसंगाला साजेसेच होते. अमेरिकेतील भारतीय समाज हा सर्वात प्रामुख्याने पुढारलेला आणि प्रगत समाज आहे आणि या भारतीयांचे अमेरिकेतील स्थान हे लक्षणीय आहे. त्यांचे अमेरिकेतील निवडणुकीतील प्रभाव टाकू शकणारे स्थान हे कुणालाही हेवा वाटण्याजोगे आहे आणि हे मोदी यांचे कर्तृत्वाचे यश आहे. मोदी यांच्यामुळे भारत आज जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था आहे आणि भारताची आजची अवस्था ही कुणालाही हेवा वाटण्याजोगी आहे. पूर्वी इंदिरा गांधी जेव्हा अमेरिकन दौऱ्यावर जात होत्या तेव्हा अमेरिकन अध्यक्ष भारतीय पंतप्रधानांकडे ढुंकूनही पाहत नसत.

रशियाचा पाठिंबा मिळवण्यासाठी इंदिरा गांधी जेव्हा अमेरिकेत तत्कालीन अध्यक्षांना भेटायला गेल्या तेव्हा इंदिरा गांधी यांना भेटही नाकारली होती. आज कोणत्याही अमेरिकन नेत्याची तशी हिंमत नाही. याच भाषणात मोदी यांनी एक नवा संदेश दिला आहे तो म्हणजे, एआय म्हणजे अमेरिकन इंडियन.

दोन देशांना जोडून केलेला हा वाक्यप्रयोग निश्चितच दोन्ही देशांना पुढे घेऊन नेणारा असेल. भारतातील अमेरिकन लोक खूश झाले यात काही शंका नाही पण भारतातील तमाम लोक यामुळे खूश झाले. कारण मोदी यांनी दोन्ही देशांतील लोकांना सहकाऱ्याची साद दिली आहे. याच दौऱ्यात बोलताना मोदी यांनी क्वाड ही कोणालाही विरोध करण्यासाठी नाही असे सांगितले. हा एक महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण क्वाडमुळे चीनला विरोध करण्यासाठी स्थापना केली आहे असा गैरसमज पसरला होता. पण तो मोदी यांच्या भाषणाने दूर झाला आहे. मोदी यांनी भारतीयांना राष्ट्रदूत असे संबोधले यावरून त्यांची देशाप्रति असलेली निष्ठा दिसते. कारण आपल्यासोबत लोकांना घेऊन जायची त्यांची निष्ठा यावरून दिसते. मोदी यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे, पण त्यांच्या भाषणातील लोकांना प्रभावित करणारे मुद्दे हेच आहेत की, त्यांनी अमेरिकेतील निवडणुकीवरही मतप्रदर्शन केले आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळेस ट्रम्प हे एक उमेदवार होते आणि आताही ते उमेदवार आहेत. पण आता मोदी यांनी ट्रम्प यांना नि:संदिग्ध पाठिंबा दिला नाही, तर त्यांनी काही हातचे राखून पाठिंबा दिला आहे. कारण बायडेन हेही एक चांगले उमेदवार आहेत आणि याची जाण मोदी यांनी ठेवली आहे. मोदी यांच्या या भाषणातून काही मुद्दे ठळकपणे समोर आले आहेत आणि ते म्हणजे भारतीयांचे अमेरिकेत असलेले वाढते वर्चस्व. पूर्वी हे पाकिस्तान्यांच्या बाबतीत खरे असायचे. अर्थात पाकिस्तान्यांचे असलेले वर्चस्व म्हणजे त्यांनी कर्तृत्वाने मिळवलेले नव्हते तर अमेरिकेची गरज म्हणून त्यांना पाकिस्तानची साथ करावी लागायची. पण आज मोदी यांनी संपूर्ण परिस्थिती उलटवली आहे आणि आज अमेरिका भारताला साथ देण्याच्या मनस्थितीत आहे. कारण त्यांना तसे करणे भाग आहे. कारण एक तर भारताची ताकद वाढली आहे आणि दुसरी बाब म्हणजे भारताने आर्थिक बाजू प्रचंड सावरली आहे.

भारत आज मजबूत स्थितीत आहे आणि जवळपास अमेरिकेच्या इतकेच भारताचे स्थान आहे. त्यामुळे भारताला दुर्लक्षून चालणारच नाही. या परिस्थितीत अमेरिकेला भारताच्या म्हणण्याला मान डोलवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मोदी यांचे हे भाषण भारताचे महत्त्व अधोरेखित करणारे होते आणि भारतीयांचे महत्त्वही ठळकपणे सांगणारे होते. न्यूयॉर्कच्या लाँग आयलंडमधील भाषणात मोदी यांनी आपल्या सेमी कंडक्टर कार्यक्रमाची प्रशंसाही केली आणि यावेळी ते म्हणाले की, भारत हा पुढे चालतो, मागे चालत नाही. भारत आज संधींची भूमी आहे हे त्यांचे उद्गार भारताच्या आजच्या स्थितीचे दिशादर्शन करणारे आहेत तसेच भारत आज कितीतरी प्रगत आहे हे दाखवून देणारे आहेत. भारताची प्रगती दाखवणारे हे भाषण मोदी यांनी करून भारत आज पहिल्यासारखा देश राहिला नाही हे दाखवून दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -