ठाणे : ठाणे पोलिसांनी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलांनी मोठा जल्लोष केला. महिलांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून बदलापुरात आनंद साजरा केला.
अक्षय शिंदेंच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना बदलापूर रेल्वे स्थानक इथे आरोपीला फाशी द्या म्हणून आंदोलन करण्यात आले. त्याच बदलापूर रेल्वे स्थानकात मंगळवारी शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी आरोपीच्या विरोधात घोषणाबाजी केली तर राज्य सरकारचं अभिनंदन केले. यावेळी हातात फलक धरत आणि पेढे वाटत आंदोलकांनी जल्लोष केला. दरम्यान ‘अरे मेला मेला नराधम मेला.. चिमुकलीला न्याय मिळाला, नराधमाला शिक्षा झालीच, शिंदे सरकारचं अभिनंदन’, अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
पोलिसांनी एन्काऊंटरचे मनसेकडून समर्थंन, पोलिसांना प्रत्येकी ५१ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर
मनसेने पोलिसांनी योग्य केल्याचे म्हणत या घटनेचे समर्थन केले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना प्रत्येकी ५१ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले. मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी माहिती दिली.
राज ठाकरे करणार विचारपूस
बदलापूर प्रकरणातल्या एन्काऊंटरनंतर या प्रकारात जखमी झालेल्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना बक्षीस जाहीर करून मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली तर दुसरीकडे आता या जखमी दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांची विचारपूस राज ठाकरे स्वतः करणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली.
तुडवून मारायला पाहिजे होते
अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांच्यात सोडून तुडवून मारले पाहिजे. सत्ताधारी, विरोधक मला काही घेणदेणे नाही. सत्ताधारी असू दे किंवा विरोधक जे कोणी असू दे, यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केले असते? बोलले असते का? गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे, अशी याप्रकरणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली बेधडक भूमिका मांडली आहे.
नराधमाचे एन्काऊंटर, तुम्हाला काय वाटते?
बदलापूरमधील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आणले जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावली व त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून फाशी द्या अशी मागणी केली जात होती आणि वारंवार सत्ताधाऱ्यांना याच मुद्द्यावर फैलावर घेतले जात होते. मात्र तेच विरोधक आता आरोपीचा एन्काऊंटर झाल्याबद्दल संशय व्यक्त करत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते?