Sunday, October 6, 2024
Homeमहत्वाची बातमीमहायुतीमधून अजित पवार गटाला बाहेर काढण्याचे षडयंत्र

महायुतीमधून अजित पवार गटाला बाहेर काढण्याचे षडयंत्र

दीपक मोहिते

मुंबई: गेल्या दोन ते तीन दिवसात दिल्लीत घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे महायुतीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या मनातले जागावाटप राज्यस्तरीय नेत्यांच्या मुखातून बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गट सावध झाले आहेत. भाजपच्या मनातले जागावाटप कसे आहे ? व हे दोन्ही गट का धास्तावले आहेत ? व या दोन्ही गटाचे या जागावाटपावर काय म्हणणे आहे ? या तीनही प्रश्नांची उत्तरे शोधायचा आपण प्रयत्न करूया.

भाजपच्या दिल्लीश्वराच्या मनातील जागावाटप-
१) भाजप-१६०,
यापैकी १२५ जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचे राज्यस्तरीय भाजप नेत्यांना टार्गेट,
२) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – ८० जागा,
३) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )-४० जागा,
४) सहयोगी अपक्ष -०९ जागा,

अशाप्रकारचे जागावाटप ठरवण्यात आल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आपल्या मुंबईच्या दौऱ्यात महायुतीच्या नेत्याना स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे अजित पवार गट हा आता धायकुतीला आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे जी पडझड सुरू झाली आहे,ती पाहून भाजप आता त्यांना महायुतीच्या बाहेर ढकलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. अजित पवार यांना भाजपच्या या कुटील नितीची चाहूल लागल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा ” सेक्युलर,” चे कार्ड वापरण्यास सुरुवात केली आहे. ते भाजपचे नितेश राणे यांचे नाव न घेता सतत टीकेची झोड उठवताना पाहायला मिळत आहे. आम्ही दुसऱ्या जाती-धर्मावर बोलणे, कदापि मान्य करणार नाही,आम्ही आमची धर्मनिरपेक्षता सोडलेली नाही,अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. आणि तेही आता ” एकला चलो रे,” अशा भूमिकेत आले आहेत. त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अजित पवार यांच्या सुरात सूर मिळवला आहे.

या सर्व घडामोडी होण्यापूर्वीच अजित पवार यांनी विशालगडाखाली राहणाऱ्या पीडितांची भेट घेणे,त्यांचे पुनर्वसन व त्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करणे,माजी मंत्री नबाब मलिक यांच्या मुलीला पक्षाचे प्रवक्तेपद बहाल करणे,तसेच मलिक यांच्या मतदारसंघात तिला उमेदवारी देणे,असे प्रकार सुरू केल्यामुळे भाजप देखील काहीसा अडचणीत आला आहे. त्यामुळे दिल्लीश्वर त्यांना स्वतंत्रपणे लढा,असे सांगण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार यांना त्यांच्या मागणीनुसार जागा मिळाल्या नाहीत,आणि ते निवडणुकीच्या रिंगण्यात स्वतंत्रपणे लढले तर त्यांना व शरद पवार गटाला फटका बसेल व ” सुंठी वाचून खोकला गेला,” हे प्रत्यक्षात उतरेल,अशी भाजपची रणनिती आहे. ते लक्षात आल्यापासून अजित पवार गुलाबी जाकीट घालून व पायाला भिंगरी लावून गरागरा फिरू लागले आहेत. महामंडळाची पदे वाटपातही अजित पवार गटाला भाजप व शिंदे गटाने डावलले,या सर्व घडामोडी,अजित पवार गटाला महायुतीमधून बाहेर काढण्याचाच एक भाग आहे,अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -