नांदगाव मुरुड : वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे वाढत चाललेल्या तापमानाचा फटका मुरुड तालुक्यातील सुपारी पिकाला बसत असून जूनपासून सतत पडत असलेला पाऊस व प्रखर उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम सुपारी झाडांच्या खोडावर होत आहे. त्यामुळे त्यांची खोडे कुजल्याने ती कधी उन्मळून पडतील याचा नेम तर नाहीच. शिवाय एका बाजूने खोड कुजण्याचा परिणाम सुपारी पिकांवर झाला आहे.
मजगावच्या डोंगर भागातील आपल्या मालकीच्या माळरान जमिनीवर येथील वसीम तांडेल यांनी तीनचार वर्षांपूर्वी लागवड केलेली सुपारीची झाडे आता उत्पादनक्षम झाली असताना झाडांच्या ज्या भागात कडक उन्हाच्या तीव्रतेची झळ बसते, तो भाग तडकल्याने त्यात पावसाचे पाणी झिरपून झाडाचे खोड कुजले.परिणामी झाडे कमकुवत होऊन त्यातील काही वाळून गेली आहेत. तर काही जेमतेम तग धरून आहेत.त्याचा उत्पादकतेवरही परिणाम झाला आहे.गेली तीन चार वर्षे रोपांच्या लागवडीपासून मोठ्या मेहनतीने जपलेली ही रोपे ऐन उमेदीच्या काळातच या विचित्र प्रकारच्या रोगामुळे केलेली मेहनत व खर्चावर पाणी पेरले जात असल्याने. येथील सुपारी बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.
तसे सुपारीचे झाड हे उंच़़च उंच वाढत असले तरी ते अतिशय नाजूक असते.सुपारी फळांपासून रोपे तयार करतांना रोप जसे वाढते त्याची उन्हाकडील बाजू पाहूनच जशाच्या तशा स्थितीत त्याची पुनर्लागवड करावी लागते अन्यथा उन्हाच्या किरणांचा झाडांच्या एका बाजूला होऊन खोडाला चिरा पडून ती कुजू लागते.याशिवाय लागवड केलेल्या जमिनीतही असलेल्या छोट्या लाल मुंग्या,वाळवी व अळ्याही झाडांना पोखरून उभे झाड अचानक सुकून जाते. त्यासाठी झाडांची लागवड केलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी, ती खडकाळ, रवाळ असल्यासही तिचा परिणाम झाडांवर व पर्यायाने उत्पादनावर होत असल्याने बागायतदार चिंतेत आहेत.अशा रोगांवर कृषी विद्यापीठाने संशोधन करून त्यावरील उपाय शोधणे गरजेचे आहे.