Tuesday, April 29, 2025

कोलाजसाप्ताहिक

मूर्ती रूपातील मंगळ ग्रहाचे जगातील एकमेव मंदिर

मूर्ती रूपातील मंगळ ग्रहाचे जगातील एकमेव मंदिर

विशेष - लता गुठे

काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमळनेर येथे जाणे झाले. तिथे गेल्यानंतर मंगळ ग्रह मंदिराविषयी माहिती मिळाली, ती अशी... अमळनेर येथील मंगळ ग्रह हे पुरातन मंदिर असून ते जागृत देवस्थान आहे. मंगळ ग्रहाची मूर्ती ही स्वयंभू आहे. जगातील मंगळ मूर्ती देवतेचे ते एकमेव मंदिर आहे असे समजले, देवी-देवतांची मंदिरे देशात जागोजागी आहेत. मात्र, एखाद्या ग्रहाचे असे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर सापडणे दुर्मिळ. ते पाहण्याचा योग आला... अवाढव्य आवारामध्ये असलेली मंगळ ग्रहाची अतिशय तेजस्वी नितांत सुंदर मूर्ती पाहून डोळे दिपले आणि मनाच्या कॅमेऱ्यामध्ये तिथे काही क्षणचित्रे टिपली ती आपल्यासमोर व्यक्त करते आहे. मंदिराचा परिसर सुमारे १५ एकर आहे.

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे गाव जळगावपासून सुमारे ६० किमी अंतरावर आहे, तर धुळेपासून अमळनेर ३६ किमी अंतरावर आहे. मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिराची संपूर्ण देखभाल केली जाते. या आवारामध्ये आणखीही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्यामध्ये मंगळग्रह मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाची मूर्ती, बाजूलाच पंचमुखी हनुमान आणि भूमिमातेची मूर्ती या देवता आहेत. या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. मात्र, मंदिर कोणी बांधले, मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली या संदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अमळनेर शहरासह परिसरातील काही जाणकारांच्या मते श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार सन १९३३ मध्ये झाला; परंतु त्यानंतर मंदिर पुन्हा दुर्लक्षित व नंतर भग्न झाले. मात्र १९९९ नंतर झालेल्या जिर्णोद्धारामुळे मंदिर आणि परिसराचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. मंदिराच्या परिसरातील विविध विकासकामे व सोयी-सुविधा छान आहेत. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारासमोर लांबलचक शेड उभारण्यात आलेले आहे. बाजूलाच नवकार कुटिया व त्याखाली शंकराची मूर्ती व जटांमधून बरसणाऱ्या धारा व धबधब्याची आरास उभारण्यात आली आहे. मंदिराच्या बाजूलाच बनविण्यात आलेली तुळसाई बाग तिच्या भव्य स्वरुपामुळे लहान-मोठ्यांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. विविध रंगाची फुले, केळीच्या झाडांची केलेली सजावट, संपूर्ण परिसरात ठेवण्यात आलेल्या विविध झाडांच्या कुंड्या यामुळे हा बगिचा खऱ्या अर्थाने सजलेला दिसतो. मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी आहेत.

येथील मंगळ देवाच्या मुर्तीचे स्वरूप पुराणात आहे. मुर्तीच्या वरच्या उजव्या हातात गदा, खालच्या उजव्या हातात त्रिशूल, वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या डाव्या हातात कमळाचे फूल आहे. त्यांचे वाहन मेंढी आहे. संपूर्ण मूर्तीवर लाल सिंदूर आहे. त्यामुळे मूर्तीच्या लाल रंगाला विशेष महत्त्व आहे.

मंगळदेव ग्रह देवतेच्या हातात शस्त्र आहेत. त्यांचा संबंध सुरक्षिततेशी आहे. त्यामुळे ती युद्धदेवता आहे असे मानतात. हातात डमरू, त्रिशूल असल्यामुळे त्याचा संबंध शिवाशीही लावला जातो. मंगळग्रह देवता ही रोगमुक्तीची, भयमुक्तीची आहे असे समजतात. एका हातात कमळाचे फूल आहे. कमळ हे लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे ते समृद्धीचे प्रतीक आहे. जे काही मागितले ते सर्व देणारी ही देवता असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. शास्त्रात मंगळग्रह देवतेला दानी म्हटले आहे. त्यामुळे त्यांची आपल्यावर सतत कृपा व्हावी, यासाठीही मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येथे भाविक येत असतात.

मंगळ ग्रहाला भूमीपूत्र समजले‌ जाते. म्हणून तिथे भूमिमातेची मूर्ती स्थापित केली असावी. तसेच मंगळदेव ग्रहाची पौराणिक व शास्त्रीय माहिती अशी सांगितली जाते की, युद्धाची मनोकामना पूर्ण करणारी देवता आहे. म्हणूनच त्या ग्रहाचे नाव मंगळ असावे असे मला वाटते. भव्य निर्मितीची देवता अशी मंगळग्रह देवतेची ओळख आहे. विख्यात पौराणिक कथेत विख्यात असलेला विश्वकर्मा यांच्या विशाल आणि अद्भुत नगरीच्या निर्मितीत मंगळदेव ग्रहाची कृपा होती अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार ग्रहांना देवतेचे स्थान प्राप्त आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा संबंध हा विवाहयोगाशीही लावला जातो. आपल्याकडे अनेक समज गैरसमज आहेत ते अंधपणे पाळले जातात. त्यापैकीच गुणमिलन, विवाह न जुळणे, घटस्फोट, अपघात या मागे मंगल दोष आहे या भयातून मंगळाचा विचार केला जातो. खरं तर मंगळग्रह मंगलकारी आहे. त्यामुळे त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. खरं तर ज्योतिषशास्त्रात मंगळाचा आपल्या शरीरातील रक्तावर अमल असतो असे म्हणतात. कुंडलीत मांगलिक योग असेल तर कुंभ विवाह करण्याचे प्रयोजन शास्त्रात सांगितले आहे. मंगळदेव ग्रह मंदिरात जे मांगलिक आहेत किंवा ज्या मुला-मुलींचा काही कारणांमुळे विवाहयोग जुळून येत नाही असे देशभरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि पूजापाठ करून मंगळ दोष कमी करतात. खरं तर ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांना त्यांचा फायदाही होतो.

कारण यांचा संबंध मानसिकतेशी असतो. म्हणूनच दर मंगळवारी सुमारे हजारो भाविक दर्शनासाठी येतात याचे कारण म्हणजे, जगात मंगळ देवतेचे एकमेव मंदिर असून ज्याला मंगल आहे किंवा नाही अशा व्यक्ती मंगळवारी तेथे येऊन भक्तिभावाने दर्शन घेऊन अभिषेक करतात. अभिषेकासाठी मंदिर समितीमार्फत योग्य दर ठरविला असल्याने तेथे फसवणूक होत नाही. भव्य दिव्य मंगळ देवतेची मूर्ती असलेले एकमेव मंदिर निसर्गरम्य आहे, प्रसादालय आहे. विशेष म्हणजे येथे कोणत्याही प्रकाराचा टॅक्स नाही, पार्किंगसाठी शुल्क नाही, दर्शनासाठी व्हीआयपी सुविधा नाही, मंदिराच्या बाहेर पूजा साहित्यासाठी मनमानी दराने विक्री होत नाही, राहण्याची आणि खाण्याची किमान दरावर उत्तम सोय, तर शुद्ध पाण्याची व्यवस्था आणि परिसरातील स्वच्छता, हिरवळ यामुळे येथील वातावरण भाविकांचे मन प्रसन्न करते.

Comments
Add Comment