Monday, October 7, 2024
Homeसाप्ताहिककोलाजजागतिक पर्यावरण आरोग्य दिन

जागतिक पर्यावरण आरोग्य दिन

पर्यावरणाचे आरोग्य जपण्यासाठी, त्याविषयी जागरूकता पसरविण्यासाठी आपल्या परिसरात असणाऱ्या जैवविविधतेचा अभ्यास किमान विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींची ओळख होईल इतक्या पातळीवर तरी करून घ्यावा. तसेच शक्य तेवढे जैवविविधता वाचविण्यास हातभार लावावा. जास्तीत जास्त झाडे आपल्या परिसरात लावावीत.

विशेष – डॉ. श्वेता चिटणीस

जागतिक पर्यावरण आरोग्य दिन २६ सप्टेंबर रोजी दरवर्षी साजरा करण्यात येतो. दरवर्षी या दिवशी पर्यावरणाविषयी जागरूकता जन मानसात निर्माण करण्यासाठी काहीतरी विशेष शीर्षकाखाली कार्यक्रम राबवले जातात. यावर्षी पर्यावरणाचे आरोग्य जपण्यासाठी सशक्त जनसमुदाय निर्माण करण्याची गरज व त्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवित हानी रोखून हवामान बदलाचा तडाखा मानवी जीवनावर कसा कमी करता येईल आणि येणाऱ्या काळासाठी कसे जुळवून घेता येईल यावर भर दिला जाणार आहे. या शीर्षकाखाली उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येकालाच सुदृढ शरीर आणि मन हव असतं; परंतु अनेक वेळा शारीरिक आणि मानसिक व्याधी माणसांच्या आयुष्याचा ताबा घेताना दिसतात. कोविड काळात आपण हे अनुभवलं आहे. निरोगी जीवनशैली आणि सुदृढ शरीर आणि मन सुंदर जीवनाचा पाया रचतात; परंतु आपण केवळ उत्तम महागडी औषधं घेऊन शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतो; परंतु परिसरात असणारी रोगराई पुन्हा डोकं वर काढते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आहे. उदाहरणार्थ परिसरात जर का डेंग्यूच्या अळ्या, भरपूर मच्छर, उंदीर, घुशी, दुर्गंधी पसरवणारा कचरा, विघटन पावणारा कचरा इत्यादी साठल्यावर त्या परिसरात राहणारी माणसं कशी काय सुदृढ राहू शकतील बरं? सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. कारण आपल्या गावाचे, शहराचे किंवा देशाचे नसून समग्र पृथ्वीचे पर्यावरणीय आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

जागतिक पर्यावरणाच्या आरोग्यासाठी कार्यरत असलेले फेडरेशन (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ) अर्थात IFEH यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे अति उष्णतेमुळे जंगलामध्ये आग लागण्याचे प्रसंग २०३० पर्यंत जास्त वाढणार आहेत आणि अधिक काळापर्यंत जंगलहानी सुरू राहील. उष्णतेची लाट जीवित हानी पोहोचवणारी ठरेल. तसेच जगात कुठे ना कुठे नैसर्गिक आपत्ती जसे की, वादळ, अतिवृष्टीमुळे पूर, दुष्काळी परिस्थिती किंवा उष्णतेची लाट यामुळे जीवित हानी पोहोचू शकेल आणि अशा नैसर्गिक आपत्तीमुळे मानवी आरोग्याला धोका उत्पन्न होईल. तसेच आर्थिक प्रगती मंदावेल. जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून समुद्रकाठाजवळ राहणाऱ्या लोकांची जमिनी, घरं आणि इतर संपत्तीला खूप नुकसान पोहोचू शकेल. यामुळे अर्थातच महामारीसारखे रोग पसरणे, हवा आणि पिण्याचे पाणी प्रदूषित होणे आणि त्यामुळे हे सर्व धोके कमी करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सध्या तरी हे सर्व प्रयत्न फक्त विद्यापीठातील कॉन्फरन्समध्ये बौद्धिक पातळीवर चर्चिले जातात. वैज्ञानिकांच्या शोधनिबंधांमध्ये या विषयांवर उत्तम कार्य करणे आणि नैसर्गिक आपत्ती थांबवण्यासाठी उपाययोजना करणे याबाबतीत चर्चा होतात; परंतु आता वेळ सरकारने केव्हा विद्वानांनी कार्य करण्याची नाही आहे तर प्रत्येकानेच पर्यावरणाविषयी जागरूकता बाळगणे गरजेचे आहे.

ही समस्या कशी काय निर्माण झाली असा प्रश्न पडतो. मानवाने प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड सुरू केली आणि अनेक प्रदेशात वाळवंट निर्माण केले. या जंगलतोडीमुळे अनेक महत्त्वाची झाडे आणि औषधी वनस्पती नष्ट झाल्या. आजही जगात औषधं बनतात ती औषधी वनस्पतींच्या पानांमधून, फुलांमधून, मुळांमधून अर्क काढून; परंतु आपण या वनस्पतीस मुळापासून नष्ट करत आहोत. त्यामुळे नैसर्गिक फार्मसीचे स्त्रोत आपण नष्ट करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्याकडे पूर्वी ठिकठिकाणी उपलब्ध असणारी अश्वगंधा नावाची औषधी वनस्पती आता ट होत चालली आहे.

महाराष्ट्रात कोकणात उगवणारी कळलावी नावाची वनस्पती जी एकेकाळी भरपूर प्रमाणात उपलब्ध होती ती सुद्धा आता अति वृक्षतोडीमुळे दुर्मीळ होत चालली आहे. या वनस्पतीचे फ्लेम लीली, अग्निमुखी असेही नाव कोकणात लोकप्रिय आहे. लहान वृक्षांचा आधार घेऊन वाढणारी ही वेल पावसाळ्यात लाल, केशरी ज्वालांसदृश दिसणाऱ्या फुलांनी बहरते. अनेक महत्त्वाच्या दुर्धर आजारांवर काम करणारी ही औषधी वनस्पती कोकणात आता दुर्मीळ होत चालली आहे. कारण मानवी स्वभावच असा आहे की “ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट उपटून खाणे’’ यामुळे पुढचा मागचा विचारही न करता भरपूर वृक्षतोड करून ही वेल आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

या वनस्पतीची वाढ व्हावी असा परिसर कमी कमी होत चालला आहे. टिकाऊ पद्धतीने या वनस्पतीची लागवड अधिक व्हावी असे प्रयत्न होताना दिसत नाही. मानसिक तणाव कमी करण्यासाठी, उत्तम झोप लागण्यासाठी आणि मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदात पूर्वीपासून करण्यात येत आहे; परंतु हे आजार वाढल्यामुळे जगभरातील औषध कंपन्या या वनस्पतीच्या अर्कांपासून औषध बनविण्यास आतुर आहेत. पूर्वीपासून फक्त आयुर्वेद नव्हे तर होमिओपॅथी, युनानी औषध पद्धती, चिनी औषधोपचारांची पद्धती आणि इतर काही औषधोपचारांच्या पद्धतींमध्ये औषधी वनस्पतींपासून निघालेल्या अंकांनी रोग बरे करण्याची पद्धत आहे. हीच पद्धत वापरून अ‍ॅलोपॅथीमध्ये या वनस्पतींच्या अर्कांपासून औषध निर्माण करून किंवा रासायनिक दृष्टीने या वनस्पतींच्या अर्कांच्या सदृश कृत्रिम औषध निर्माण करून वाटेल त्या भावाने बाजारात औषधे उपलब्ध केली जात आहेत.

मुळात आपण राहतो तो परिसरच दूषित झाला तर आपल्याला अनेक कीटक, मच्छर, रोगराई पसरवणारे प्राणी यांच्यासोबत त्याच परिसरात राहावे लागते. मानवी शरीर जसेजसे या परिसराशी जुळवून घेते तसे त्याची प्रतिकारशक्ती कमी कमी व्हायला लागते. साधी औषधंही काम करेनाशी होतात. त्यामुळे औषधांचे डोस व त्यांची मात्रा अधिक प्रमाणात घ्यावी लागते. शरीरावर दुष्परिणाम होतात आणि शरीर आणखीन कमकुवत होऊ लागते.

हे सर्व टाळण्यासाठी उपायसुद्धा आपल्या हातातच आहेत. आपल्या परिसरात असणाऱ्या जैवविविधतेचा अभ्यास किमान विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींची ओळख होईल इतक्या पातळीवर तरी करून घ्यावा. शक्य तेवढी जैवविविधता वाचविण्यास हातभार लावावा. शक्य असल्यास जास्तीत जास्त झाडे आपल्या परिसरात लावावीत. कचऱ्याचे ढीग साठू नये याची काळजी घ्यावी. परिसरातले नदी, नाले, समुद्रकाठ स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. वायुप्रदूषण आणि पाण्याचे प्रदूषण टाळावे. जेणेकरून आपला परिसर स्वच्छ, निरोगी राहील. त्यामुळे आपल्यालाही सुदृढ शरीर आणि मन प्राप्त होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -