क्राइम – अॅड. रिया करंजकर
सकाळचा पेपर वाचायला घेतला की कुठे ना कुठे मुलींच्या बाबतीत अत्याचाराच्या बातम्या छापून आलेल्याच असतात. सध्याची परिस्थिती अशीच आहे. मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येऊन बसलेला आहे. एखादी मुलगी, स्त्री घरातून कामानिमित्त बाहेर गेल्यावर ती परत सुरक्षित येईल की नाही हा मोठा प्रश्न घरातील जाणत्या माणसांना असतो. समाजात होणारे अत्याचार बघून काही पालक तर आपल्या मुलींना घराच्या बाहेर पाठवत देखील नाहीत. काही पालक तर आपल्या मुलींचे लग्न लवकर लावून मोकळा होण्याच्याही विचारात आहेत. पुरुषांच्या मुलांच्या पाचवी वासनेला मुली आणि स्त्रियांचा मात्र बळी चाललेला आहे. एवढेच नाही तर स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर गदा घातली जात आहे.
मुंबई शहरालगत आणि उप शहरांमध्ये अनेक कंपन्यांचे गोदाम आहेत. या ठिकाणी पुरुषांबरोबर स्त्रिया, मुली कामाला असतात. तिथे काम करणाऱ्या स्त्रियांवर लक्ष ठेवायला काही महिला अधिकारी व पुरुष अधिकारी असतात. कामाच्या ठिकाणी जर महिलांवर अत्याचार होत असेल, तर तिला न्याय कसा मिळवून द्यायचा यासाठी स्टेप बाय स्टेप प्रकरणे हाताळली जात असतात. कारण कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला मर्यादित अधिकार दिलेले असतात. त्या अधिकाराचा वापर करून एखादी व्यक्ती पुढे जात असते.
श्रद्धा ही अशीच एका नामांकित कंपनीमध्ये पॅकिंग डिपार्टमेंटला कामाला होती. शिक्षण जास्त नसल्यामुळे ती पॅकिंग डिपार्टमेंटला होती. तिथे तिच्या सोबत अनेक मुली, मुलेही काम करत होते. काम करताना मुला-मुलींमध्ये मस्करी होत असे. कोण कोण एवढं मनाला लावून घेत नसतं. पण एक दिवशी सुरेशने श्रद्धाची छेड काढली. श्रद्धाने त्याला समजावून दमदाटी दिली. सुरेशला वाटलं की ही मुलगी काय करणार म्हणून पुन्हा एकदा त्याने तिची छेड काढण्याची हिम्मत केली. त्यामुळे श्रद्धाने त्याची तक्रार कंपनीच्या एच आर राजेशकडे केली.
एचआर राजेशने आपल्या अधिकारात असलेल्या अधिकाऱ्यानुसार सुरेशची तक्रार आपल्यावरील अधिकाऱ्यांकडे केली. पण अजूनपर्यंत सुरेशवर कारवाई का केली जात नाही याबद्दल श्रद्धा आणि तिचे सहकारी राजेशला विचारत होते. तेव्हा राजेशने आपण तुमची तक्रार पुढे पाठवलेली आहे असे सांगितले. पुढचे अधिकारी याच्यावर कारवाई करतील असे त्याने समजावून सांगितलेले.
एक दिवस राजेश त्याच रस्त्याने कंपनीकडे जात असताना श्रद्धा आणि तिच्या मित्रांनी राजेशची बाईक अडवली आणि त्याला लोखंडाने मारलं. त्याला एवढं मारलं की त्याचे हातपाय अक्षरश: फ्रॅक्चर झाले. जवळ असलेल्या लोक वस्तीतील लोकांनी मध्यस्थी केल्यामुळे हे प्रकरण तिथेच मिटलं. राजेशला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यावर त्याच्या दोन्ही पायांना फॅक्चर आणि हातांना फॅक्चर झाले होते. तिथूनच राजेशने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. श्रद्धा आणि तिच्या मित्रांना पोलिसांनी तत्काळ पकडलं आणि हाफ मर्डरच्या कलमाखाली त्या दोघांनाही ताब्यात घेतले.
राजेशला मारण्याचे कारण एवढेच होते की, त्याने सुरेश विरुद्ध कोणती कारवाई केली नव्हती. पण राजेशचे असे म्हणणे होते की माझ्या अधिकारात आहे त्याप्रमाणे मी यांची तक्रार माझ्या वरच्या अधिकाऱ्यांना पाठवलेली आहे. ते कारवाई करतील. श्रद्धा आणि त्याच्या मित्रांचे म्हणणे असे होते की तू कारवाई करावी. राजेश कोणती हालचाल करत नाही या रागापोटी श्रद्धा आणि तिच्या मित्रांनी राजेशला मारले होते. ज्याने छेड काढले तो सुरेश मात्र बाजूलाच राहिला आणि ज्याची काहीही चूक नव्हती त्या राजेशला मात्र फॅक्चर होईपर्यंत मार मिळाला. त्याच्यामुळे हाफ मर्डरच्या कलमाखाली ते दोघेही पोलीस कस्टडीमध्ये आहेत. श्रद्धाने थोडा वेळ घेऊन आपल्यावरील अधिकाऱ्यांना याच्याबद्दल विचारले असते तर राजेशला हॉस्पिटलला आणि स्वतःला तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती.
समाजात अनेक छेडछाडी प्रकार होत आहेत ते कसे हाताळावे यासाठी आपल्याला योग्य लोकांचे मार्गदर्शन घेऊन ते हाताळणे अधिक योग्य आहे.
(सत्यघटनेवर आधारित)