नवीन बस उपलब्ध नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी
माथेरान : माथेरानसाठी २००८ मध्ये कर्जत नेरळ मार्गे माथेरान मिनीबस सेवा सुरू होऊन जवळपास पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्वसामान्य लोकांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी असणाऱ्या मिनीबस जुन्या झाल्याने अनेकदा घाटरस्त्यात बंद पडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे प्रवाशांना उन्हातान्हात पायपीट करावी लागते. काही महिन्यांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी नवीन बस देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप या कर्जत – माथेरान मार्गावर नवीन बस उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
स्थानिकांनी अनेकदा संघर्षाला सामोरे जाऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा यासाठी कठोर परिश्रम घेऊन ही मिनीबसची सेवा उपलब्ध करून घेतली होती. या मार्गावर दोन बसेस देण्यात आल्या आहेत; परंतु यातील एक बस कर्जत पनवेल अशी फेऱ्या मारत असून एक बस कर्जत नेरळ मार्गे माथेरान अशा फेऱ्या करत आहे. घाट रस्त्यात ही बस वारंवार बंद पडत असते. यामुळे शालेय विद्यार्थी, व्यापारी वर्ग त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मिनीबसच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातून सर्वाधिक भरघोस उत्पन्न मिळत असताना देखील परिवहन महामंडळ इकडे का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न अनेकांमधून उपस्थित केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या मिनीबस या मार्गावर सुरू व्हाव्यात यासाठी अनेकदा उपोषणे त्याचप्रमाणे स्थानिकांनी, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील निवेदने कर्जत आगारात त्याचप्रमाणे वरिष्ठांना सुध्दा दिलेली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतलेल्या आहेत; परंतु अद्याप इथे नव्याने बसेस सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिकांमधून याबाबत प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
कर्जत तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी एकमेव बस
नेरळ, कर्जत अथवा बदलापूर या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मिनीबस सेवा ही जीवनवाहिनी बनली आहे. आजवर शेकडो विद्यार्थ्यांनी परिसरात जाऊन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्याने ही मुले विविध क्षेत्रात,व्यवसायात, नोकरीत चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत तर नियमितपणे प्रवास करणाऱ्या व्यापारी वर्गाला स्वस्त आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी ही सेवा खूपच सोयीस्कर बनलेली आहे. कर्जत तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी ही एकमेव बस असल्याचे बोलले जात आहे.