Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजपालघर

वाडवळ समाज स्वतःच्या मेहनतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला!

वाडवळ समाज स्वतःच्या मेहनतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला!

दिपक मोहिते


पालघर : पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर राहणारा सोमवंशी क्षत्रिय समाज म्हणजेच " वाडवळ," समाज होय.हा समाज महाराष्टाच्या पश्चिम किनारपट्टीवर वसई तालुक्याच्या दक्षिण सीमेपासुन डहाणू तालुक्याच्या उत्तर सीमेपर्यंत असलेल्या लांबलचक पट्ट्यात प्रामुख्याने वसला आहे.पुढे तो मुंबई पार करून रायगड तालुक्यात अलिबाग ते मुरूडपर्यंत विखुरला गेला.पारंपारिक पद्धतीने शेती व बागायती करुन सोमवंशीय क्षत्रिय समाज स्वत:चे अस्तित्व टिकवून राहिला.त्या काळातही सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे काही विशिष्ट कुलाचार व गोत्रप्रवरे होते.


वज्रेश्वरी,महालक्ष्मी,एकवीरा,शितलादेवी,महिकावती,इ.कुलदेवता होत्या.मुळचे क्षत्रिय असल्याने विवाहासारख्या प्रसंगी वापरण्यासाठी प्रतिकात्मक असा सिंहासनाचा मान सोमवंशीय क्षत्रिय समाजाला मिळाला होता.त्या सिंहासनावर पाच कलश असत म्हणून हा समाज " पाचकळशी," म्हणून ओळखला जाऊ लागला.रुढींचे प्राबल्य,अल्पसंतुष्टता,नव्या संबंधाची उदासीनता,इ.कारणामुळे तो स्थितप्रज्ञ बनला.


अनेक शतके तो शेती व वाड्या करीत राहील्यामुळे पुढे " वाडीवाला समाज," म्हणूनही ओळखला जाऊ लागला. कालांतराने पुढे त्याचा " वाडवळ," असा अपभ्रंश झाला.सुमारे चार ते पाच शतके अशा स्थितीत गेल्यानंतर राजकीय व धार्मिकदृष्ट्या एक मोठी उलथापालथ करणारी घटना घडली.पोर्तुगीजानी सन १५३१ मध्ये वसई काबीज केली व त्यांचा अमल या भागावर सुरु झाला.या काळात हिंदुवर त्यांनी धार्मिक अत्याचार केले,बाट्वाबाटवी केली. त्याची झळ सोमवंशीय क्षत्रिय समाजाला फार मोठ्या प्रमाणावर बसली.वसई हे पोर्तुगीजांचे मुख्य ठाणे होते. वसईच्या उत्तरेस तारापूर,शिरगांव,केळवे व माहीम,या गावीही पोर्तुगीजानी लहानमोठे किल्ले बांधून आपली ठाणी वसवली होती.त्यामुळे या भागात राहणार्‍या लोकांनाही काही प्रमाणात त्यांच्या धर्मिक छळाला तोंड द्यावे लागले. पुढे इ.स.१७३९ मध्ये श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांच्या वसईच्या यशस्वी मोहीमेमुळे व तारापूरच्या रणसंग्रामामुळे पोर्तुगीजांची या भागावरील सत्ता उखडली गेली व या भागातील हिंदू धर्मावर आलेले संकट टळले.पर्यायाने सोमवंशीय क्षत्रिय समाजालाही जीवदान मिळाले.


सोमवंशीय क्षत्रिय समाज शेतीप्रधान बनला होता." वाडवळ," झाला होता.भात व नागलीसारखी शेतपीके व नारळी फोफळी,काजू,फणसारखी फळझाडे,यांची लागवड त्याकाळी होत होती.पुढे एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात समाजाचे लोक ऊस लावू लागले.पुढे हळुहळु केळी व विड्याच्या पानाची लागवड होऊ लागली.वेलची,तांबडी,बसराई,राजेळी,अशा विविध जातींच्या केळ्यांचे उत्पादन या भागात होवू लागले.केळवे,माहीम भागात " आले," याचीही लागवड मोठ्या प्रमाणात होत असे.त्यानंतरच्या काळात ऊस, केळी, आले, नारळ, आंबे, पानवेली व हंगामी भाजीपाला इ.पिकांची बागायती या भागात होऊ लागली. अशा रीतीने सोमवंशीय क्षत्रीय समाज शेतकरी व बागायतदार समाज झाला. परंतु तो आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच राहीला होता. सन १८६४ मध्ये रेल्वे मार्ग सुरु झाल्यावर मात्र वसईच्या खाडीच्या उत्तरेकडे असलेला भाग हा मुंबई शहराच्या समीप आला आणि या शहराशी या समाजाचे नवे आर्थिक संबंध प्रस्तापित झाले. याच सुमारास समाजाच्या आर्थिक जीवनाच्या दृष्टीने घडलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंगालमधून आणलेल्या काळ्या जातीच्या पानवेलीची लागवड. वसई,केळवे-माहीम या भागातील जमीन,हवामान,पाण्याची उपलब्धता,ही नैसर्गिक संसाधने,या जातीच्या पानाच्या लागवडीस अनुकूल होत्या.तसेच रेल्वे वाहतुकीची सोय उपल्ब्ध झाल्यामुळे एक नवे बागायती पीक या समाजाच्या हाती आले व लोक आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम झाले.


पुढे काही वर्षानी बोर्डी परीसरात चिकूची लागवड सुरु झाली,चिकुचे पीक बारमाही असल्यामुळे त्या भागातील लोकांच्या आर्थिक स्थैर्यास ते कारणीभूत ठरले.चिकू प्रमाणेच तोंड्ली, मिरची, कारले इ. पीके ही बोर्डी, चिंचणी व तारापूर या भागातील शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली.रेल्वे मार्गाची सोय उपलब्ध झाल्यावर माकुणसार, वेढी, चटाळे इ. गावांच्या मंडळीनी दूग्धव्यवसाय सुरु केला. विरार, आगाशी, परीसरात गुलाब, मोगरा, कागडा,  नेवाळी, इ. फुलझाडांची बागायती सुरु झाली. एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यत हा समाज इतरांसारखाच जवळजवळ निरक्षर होता समाजाच्या वस्तीभागात त्यावेळी अजिबात शाळा नव्हत्या.सन १८६० नंतर बोर्डी, चिंचणी, माहीम्, विरार आगाशी, तरखड इ. गावी प्राथमिक शाळा स्थापन झाल्यामुळे काही मंडळीना लिहिता वाचता येऊ लागले. पुढे त्यापैकी काही जण आपली जन्मगावे सोडून मुंबईला स्थलांतरित झाली व तेथेच स्थायिक झाली.


सन १९१८ च्या सुमारास अण्णासाहेब वर्तक,तात्यासाहेब चुरी,मुकुंदराव सावे प्रभृती पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येउन समाजाला सुशिक्षित,सुसंघटित व नितीमान बनवण्याचे ध्येय उराशी बाळगले व प्रयत्न सुरु केले. त्यांच्या प्रयत्नास बोर्डीचे माधवराव राऊत्,माहीमचे जनोबा हरी ठाकूर यांनी मोलाचे सहकार्य केले.या सर्वांनी एकत्र येऊन चिंचणी येथे ९ मार्च १९१९ रोजी निरनिराळ्या गांवातील प्रमुख कार्यकर्त्यांची सभा घेतली व त्या सभेत समाजाचा संघ स्थापन करुन त्याद्वारे समाजोन्नती साधण्याचा संकल्प जाहीर केला.


संघशक्तीचे महत्त्व पटवून संघाच्या शाखा स्थापन करण्यात आल्या.अशाप्रकारे स्थापन करण्यात आलेल्या सर्व शाखांचे योग्य पद्धतीने सुत्रसंचालन करण्यासाठी २८ मार्च १९२० रोजी एक स्वंयसेवक मंडळ व स्थापन करण्यात आले आणि याच दिवशी संघाची स्थापना झाली.


अण्णासाहेब वर्तक आणि तत्कालीन इतर समाज सुधारकांनी समाजाला सहकार्य केल्यामुळे या जातीला खऱ्या अर्थाने अस्तित्व प्राप्त झाले.१९२० च्या सुमारास या समाजाची लोकसंख्या जेमतेम ८ ते ९ हजाराच्या घरात होती. आज या समाजाची नोंदणीकृत ५१ गांवे (शाखा) आहेत.त्यापैकी समाजाचे काही लोक मुंबई -पुणे शहरात राहत असले तरी त्यांची समाजासोबत असलेली नाळ अद्याप तुटलेली नाही.२००९ च्या शिरगणतीवरून या समाजाची लोकसंख्या सध्या पन्नास हजाराच्या आसपास आहे.

Comments
Add Comment