जैवसाखळीतील एक उपयुक्त जीव म्हणून या काळात कावळ्याचे महत्त्व न नाकारता अशा वेगळ्या पद्धतीने केलेले दानही पितरांना संतुष्ट करत असेल याची खात्री वाटते. शेवटी माणूस महत्त्वाचा असतो. आपल्यातून गेलेल्या व्यक्तीचे मरणोत्तर जग आभासी आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडले आहे. त्याला ओढून-ताणून आपल्या जगात आणण्यापेक्षा या जगात, आपल्याबरोबर राहणाऱ्या पण जाणिवा मृतवत झालेल्या लोकांच्या आयुष्यात आशेचा एक किरण आणणे हे पितरकर्म नसेल कदाचित, पण मनुष्यकर्म नक्कीच आहे. या आयुष्यात मनुष्य म्हणून जगताना मनुष्यकर्म करणंही पुरेसे आहे.
विशेष – आरती देशपांडे
मानवी आयुष्य सोहळ्यांच्या हिंदोळ्यांवर झुलत असते. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या सोहळ्याला भारतीय संस्कृतीने अग्रस्थान दिले आहे. जीवजंतूंसोबतच मृतात्म्यांबाबतही कृतज्ञता व्यक्त करण्याची रीत संस्कृतीने घालून दिली आहे. स्मरण करणे, उपकारांमधून उतराई होण्याचा प्रयत्न करणे या हेतूने पितृपक्ष पंधरवडा पाळला जातो. अलीकडेच सुरू झालेल्या पितृ पंधरवड्यानिमित्त या प्रथेमध्ये कालानुरूप होणाऱ्या बदलांचा हा मागोवा.
उदय आणि अस्त हा सृष्टीचा नियम आहे. याच नियमानुसार ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू अटळ असतो. पुराणकथांमध्ये किंवा तत्त्वज्ञानामध्ये मृत्यूचा उल्लेख अंतिम सत्य असा केला जातो. ८४ लक्ष योनींमधून फिरून थकून-भागून आल्यानंतर व्यक्तीला मानवी जन्म मिळतो असे म्हणले जाते. त्यामुळे ८४ लक्ष जन्मांनंतर मिळणाऱ्या जन्मावर माणसाचे अतिव प्रेम असते. आयुष्याच्या या अतिव ओढीमुळेच त्याला मृत्यूची द्वेषयुक्त भीती असते. मृत्यूबाबत इतके भय मानवाच्या मनात असण्याचे कारण म्हणजे मृत्यूनंतरच्या आयुष्याबाबतची संदिग्धता. मृत्यूनंतर आयुष्य कसे असेल, याबाबत आजपर्यंत फक्त कल्पनाच लढवल्या गेल्या आहेत. त्याला कोणताही पुरावा नाही. याच कारणामुळे व्यक्तीला मृत्यूपश्चात असणाऱ्या आयुष्याचे गूढ कुतूहल आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व कथांना नाकारत असलं तरी मानवी कल्पनाशक्तीच्या जोरावर मानवाने मृत्यूपश्चात असलेल्या विश्वाची कल्पना केली आहे.
महत्प्रयासाने मिळालेले आयुष्य निती-नियमांच्या रेषेवरून सुस्थितीत चालावे यासाठी पूर्वजांनी मानवी वर्तणुकीचे नियम लिखित स्वरूपात घालून दिले. यालाच उपनिषदं, वेद, पुराण अशा नावांनी संबोधले गेले. या रूपरेषेवरून चालणे हे काही काळासाठी शक्य असले तरी स्वत:ला सदा सर्वकाळ या नियमांमध्ये बांधणे शक्य नसते. अशावेळी या नियमांचा गरजेपुरता संदर्भ घेतला जातो आणि कार्य पार पाडले जाते. स्वातंत्र्य आणि प्रलोभने यांच्यामध्ये मानवी मन गुरफटत जाते आणि म्हणूनच अंतिम सत्याकडे डोळेझाक होऊ लागते. विषयवस्तूंच्या गराड्यात असलेला मानव बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर उत्तम आरोग्य सुविधा निर्माण करतोच पण मृत्यूला जगण्याचेही मनसुबे रचतो. आयुष्यभरात जोडलेले आसपासचे नातेसंबंध त्याला अंतिम क्षणी मोहात पाडतात. आयुष्याच्या कातरवेळी तो गतकाळातील स्मृतींमध्ये रममाण होताना दिसतो. मृत्यूनंतर आपण सगे-सोयऱ्यांपासून लांब जाणार आहोतच, याशिवाय हा प्रवास आपल्याला एकट्याने करावा लागणार या जाणिवेने तो जास्त अस्वस्थ होत राहतो. डोळ्यांसमोर घडलेला एखादा मृत्यूची दृश्ये त्याची पाठ सोडत नाहीत.
मानवी जीवनातल्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेचे सोहळे साजरे केले जातात. या सोहळ्यात मृत व्यक्तीच्या संदर्भात असलेल्या सोहळ्यांचाही समावेश असतो. दु:खाची किनार असणारा हा सोहळा प्रियजनांच्या मरणोत्तर शांतीसाठी जड अंत:करणाने का होईना, पार पाडला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये जिवंत व्यक्तीबरोबरच मृतात्म्यांच्या भावनांचाही विचार केला जातो. पितरांनी त्यांच्या मृत्यूनंतरही आपल्यावर कृपा करत राहावी, गूढ संदेशांद्वारे अप्रत्यक्षरीत्या का होईना, आपल्याला मार्गदर्शन करत राहावे, त्यांना सुग्रास भोजनाचा नैवेद्य दाखवून तृप्त करून आशीर्वाद मिळवावेत आणि पुढची वाटचाल करावी या साध्या आणि सहज विचारसरणीतून पितृपक्षात घरातील मृत व्यक्तीसंबंधीची पितरकर्मं करण्याची प्रथा निर्माण केली गेली असावी.
भारतीय संस्कृतीत मृत्यूनंतरच्या प्रवासाची संकल्पना गृहीत धरली आहे. या संकल्पनेमुळेच मृत व्यक्तीचे श्राद्ध करणेे, त्यांना तर्पण करणे या प्रथा आढळतात. भाद्रपदातला कृष्णपक्ष हा श्राद्धपक्ष किंवा पितृपक्ष मानला जातो. या पंधरवड्यात आपल्या पूर्वजांचे, पितरांचे स्मरण करून ते ज्या योनीत असतील तिथे सुख-शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. धार्मिक कृत्यांच्या प्रथेनुसार श्राद्धाच्या दिवशी पितृदान तर्पण केले जाते. या कार्यानिमित्त घरातील सगळे एकत्र येतात, एकत्र बसून दोन घास खातात. यशाशक्ती दानकर्म पार पडते. हयात नसलेल्यांच्या आठवणी निघतात. एक प्रकारे हा पांगलेल्या कुटुंबाला एकत्र आणण्याचा उपचारही ठरतो. आता हयात नसलेल्या शरीरांनी पूर्वी या आप्तेष्टांमधील दुवा म्हणून काम केलेले असते. त्यांनी कुटुंबाची ही मोळी बांधून ठेवलेली असते, मोळी एकत्र टिकवून ठेवलेली असते पण गाठ सैल होताच मोळीतली काष्ठं विखुरण्यास वेळ लागत नाही. कदाचित हीच अप्रिय बाब टाळण्यासाठी आणि घरातील सर्वांना आपल्या मूळ वृक्षाच्या सयीच्या सावलीत पुन्हा एकत्र आणण्यासाठी या कर्माचे प्रयोजन असावे. कारण अगदी आता-आतापर्यंत लोकं एक वेळ सणाला एकत्र येत नसतं पण घरातील पितृकर्माला आवर्जून उपस्थित राहत असत. देवाच्या आशीर्वादाबरोबरच पितरांचा आशीर्वाद महत्त्वाचा अशी आजही अनेकांची प्रबळ धारणा आहे. ही धारणा काही देवो अथवा न देवो, घराला एकत्र बांधून ठेवते याबाबत मात्र शंका घेऊ नये.
या पंधरवड्याच्या कालावधीत अनेक धार्मिक बाबी पार पाडल्या जातात. त्यात बरेचदा अवास्तव कर्मकांडांची मिसळ केली गेल्याने मूळ हेतू बाजूला पडण्याची शक्यता असते. सध्याच्या वेगवान युगात प्रत्येकाचा या सर्व कृतींवर विश्वास असेलच किंवा त्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होईलच असे नाही. ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे करण्यासाठी खस्ता खाल्या, मोहांना टाळून कसे पुढे जावे याचा आदर्श घालून दिला त्या आपल्या पूर्वजांबद्दल, पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांना समाधान होईल, असे आचरण करणे हा पितृपक्षाचा मूळ हेतू असतो. पितरांच्या उपकारांची उतराई होण्याचा सोहळा म्हणजे पितृपक्ष पंधरवडा होय. पितरांचे एखादे अपुरे ध्येय पुत्राने अगर कन्येने पूर्ण करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारल्याने पिता अगर माता निश्चितपणे संतुष्ट होतील. हे करत असताना पुत्राला अगर कन्येलाही समाधान मिळेल. पितरांची आठवण करण्याचे हे दिवस पवित्र मानले पाहिजेत. आपल्यालाही पितरांप्रमाणे एक दिवस जायचे आहे, याचे भान याच दिवसांत मनावर ठसले जाते. या भूतलावर आपल्याला मिळणारा वेळ विधायक कामांसाठी वापरावा याचे भान येते. या श्राद्धपक्षात सत्कृत्याचे पाथेय बांधण्याची मनाची जिद्द वाढते. एकदा सत्कृत्याचे पाथेय बांधण्याचा निश्चय केला की जीवन अधिकाधिक क्रियाशील बनते. कदाचित हा धडा देण्यासाठी या पंधरवड्याचे प्रयोजन
केले असावे.
बरेचदा पितृ पंधरवड्याचा हा काळ अनिष्ट समजला जातो. या काळात नवी खरेदी, मंगल कार्याचा शुभारंभ केला जात नाही. समाजातला एक वर्ग अजूनही या काळाला नाकं मुरडतो. पण हळूहळू समाजाच्या समजुतीत बदल घडू लागला आहे. समाज जुन्यासोबत नव्या विचारांची गुंफण करून नवी विचारधारा प्रवाहित करत आहे. त्यामुळे या काळातही काही नवीन कामांचा श्रीगणेशा होतो. अगदी मोठी खरेदी होत नसली तरी बाजारातील कमी वर्दळ, मागणीअभावी कमी पातळीवरील भाव यांचा लाभ घेण्यासाठी पुढच्या उत्सव काळातील खरेदी करण्यासाठी या पंधरवड्याचा काळ उचित समजला जातो. या कार्यक्रमांचा अधिक गाजावाजा न करता आवश्यक ते उपचार करून दिनक्रम सुरू ठेवणे ही आजची गरजच आहे. त्यामुळे बऱ्याच घरांमधून कर्मकांडाचा अतिरेक न करता विशिष्ट तिथीला दानधर्म करणे, वृद्धाश्रमात अथवा अनाथालयात अन्नदान वा इतर वस्तूंचे दान करणे, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे ही स्त्युत्य कर्मं पार पाडली जातात. समजुतीने घेतलेले हे चांगले वळण आहे असे म्हणावे लागेल.
जैवसाखळीतील एक उपयुक्त जीव म्हणून या काळात कावळ्याचे महत्त्व न नाकारता अशा वेगळ्या पद्धतीने केलेले दानही पितरांना संतुष्ट करत असेल याची खात्री वाटते. शेवटी माणूस महत्त्वाचा असतो. आपल्यातून गेलेल्या व्यक्तीचे मरणोत्तर जग आभासी आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडले आहे. त्याला ओढून-ताणून आपल्या जगात आणण्यापेक्षा या जगात, आपल्याबरोबर राहणाऱ्या पण जाणिवा मृतवत झालेल्या लोकांच्या आयुष्यात आशेचा एक किरण आणणे हे पितरकर्म नसेल कदाचित, पण मनुष्यकर्म नक्कीच आहे. या आयुष्यात मनुष्य म्हणून जगताना मनुष्यकर्म करणंही पुरेसे आहे. हे करत राहिले तर आयुष्याच्या अखेरीस संध्याछाया दाटून आली तरी जीव कासावीस होणार नाही, काय केले या सोन्यासारख्या आयुष्यात, असा व्यथित करणारा प्रश्न भेडसावणार नाही. संधी असूनही लोकांशी चांगले वागू शकलो नाही ही खंत त्रास देणार नाही. उलटपक्षी, यमदूताच्या स्वागताला तनाबरोबर मनानेही आपण सिद्ध असू. मिळालेल्या आयुष्याबद्दल कृतार्थता आणि आतापर्यंत केवळ कथांमधून ऐकलेल्या स्वर्गनगरीच्या प्रवासाला सिद्ध असू. हे शक्य झाले तर आपल्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पुढच्या पिढीतील कोणालाच कर्मकांडाची मदत घ्यावी लागणार नाही.