Tuesday, April 22, 2025

रेशीम धागा…

माेरपीस – पूजा काळे

दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे… दत्त दिगंबर दैवत माझे…

रात्रीच्या पारी दत्तमंदिरात चाललेल्या एकसंथ भजन-कीर्तनाने विलासला गहिवरून येत होतं. वर्षांपूर्वी कुटुंबासह घर सोडल्याचा पश्चाताप करत, शांत उभ्या दत्त मूर्तीला न्याहाळत पायरीवर बसला होता तो. घाई-गडबडीत घेतलेल्या निर्णयामुळे आयुष्य फसलं होतं. कंठात दाटून आलेल्या आठवणीनं अश्रू गाळत होता तो.

आताशा घरातल्या पडवी, भिंतीनीही बोलावणं धाडलं होतं त्याला. वडिलोपार्जित घर सांभाळता सांभाळता दमून थकलेली आई डोळ्यांसमोरून हलत नव्हती. आसपास कोणी नसताना आत्ममग्न अवस्थेत बांध सुटला होता त्याचा. “आईसोबत आलेला साडीपदर कधीही वेगळा भासला नव्हता. आहिस्ता आहिस्ता आधी आईची आणि मग नऊ महिन्यांनंतर तिच्या साडीपदराची ओळख झाली ती झाकल्या पदराखालच्या दुधाने. त्यानंतर तो आश्वस्थ पदर अधिकचं जवळचा भासू लागला. शाळा ते कॉलेजवयीन जीवनात वेगवेगळ्या कारणांसवे हक्काचं मनमोकळं स्थान होताना वेळोवेळी आरक्षित, सुरक्षित ठरत गेला तो. सहज विसरलो माधुऱ्याच्या सागराला, पावित्र्याच्या आगराला तिच्या साडी पदराला. घरातल्या घरात पदराभोवती गिरक्या घेणं, बाबांनी दिलेल्या सज्जड दमानंतर टिपूसभर आलेले अश्रू पदरानं पुसणं पदराच्या वारेमाप गोष्टी रहस्य पटलासारख्या बाहेर येत होत्या. आई अक्षरात श्रृतिस्मृती सामावली असताना का असा नतद्रष्ट वागलो मी? काही बाही ऐकून रागे धरून बसलो, ज्याने नांगर फिरवला घरादारावर. घरातल्या अंगण, कोपऱ्यात रांगलो, फिरलो आणि मोठा झालो पण त्या घरालाचं लाथाडलं. परत मागे म्हणून फिरलो नाही. अहंपणाचं टोक गाठलं. या जगातून कायमचं जाताना आईला पाहताही आलं नाही? चुका पोटात घालून क्षमा करत गेलेली आई परत येणार नाही, ही खंत आताशा जगू द्यायची नाही मला. गेले दोन महिने देवळात क्षमायाचना करणाऱ्या विलासची कीव का करावी हा मला पडलेला प्रश्न? असलं हे प्रकरण. पण जेव्हा नायकाच्या व्यथा आई या शब्दाशी येऊन थांबतात, तेव्हा त्याच्या दुखापेक्षा ती माऊलीचं मला अधिक भावते. आईची माया न लाभलेला विरळाचं, पण इथं विलासचा स्वभाव मारक ठरलेला.

आई माझा गुरू, तोच माझा कल्पतरू | तिला कसे मी विसरू |

सानेगुरुजींच्या रचनेतलं सत्य शोधायच्या मागे भ्रमिष्ठावस्था प्राप्त झालेला असा हा नायक समाजात अत्र तत्र सर्वत्र सापडतो. जो विसरलाय कर्तव्याला. पण सर्वाप्रती बांधिल असलेली माय मोठी असते. आपल्या घरादारावर, मुलांवर माया करते ती आई. छायेचं पांघरूण घालते ती आई. आपलं सुखदुःख समजून चकार शब्द न बोलता उमजून घेण्याचे भाऊक मन बाळगते ती आई. संस्काराचे बाळकडू पाजते तीही आईच. आई मुलांचे हृदयस्थ नाते आजवर कुणालाही कळलेले नाही. स्त्रीच्या नानाविध रूपातली प्रेमाची भाषा प्राणिमात्रांना देखील कळते. मग आपणचं असे का निपजतो? सर्वस्व देण्याच्या नादात आई अस्तित्व विसरते स्वत:च. लहानग्यांना मोठे करताना त्यागाचे, कष्टाचे, प्रेमाचे प्रतीक असलेली माय मुलांना अडचण वाटते तेव्हा वाईट वाटतं. तिच्यातल्या चांगल्या गोष्टी जाणीवपूर्वक उणिवा ठरतात. त्या तशा दाखवल्या जातात. ती तुटते आतल्या आत. बोलत नाही काही. पण विरते मनातल्या मनात. इथूनच घराचे घरपण नाहीस होते. आई-मुलामधली दरी मोठी होत जाते. आईच्या दुःखाचा मोडलेला पार, सहन करत जात घर आरपार.

कळायला लागल्यापासून बालपण जोपासणाऱ्या, प्रसंगांना सामोरे जाणाऱ्या घराविषयी जिव्हाळ्याचे स्थान निर्माण झालेले असते ते अशा वेळी कोलमडते. नात्यामध्ये दुरावा वाढतो. घरावर आसूड उठतो. प्रवासी साक्षीदार असणारे घर दूर सरत. चांगले संबंध ताणले जातात. वाळवीने सुकून-वाळून जावे असे, वातावरण निर्माण होतं, आईच्या कौतुकावर हारतुरे घालणारे हात आईवर नुकसानीचे दावे मांडतात. खवळलेल्या समुद्रात भरकटलेल्या जहाजाला दीपस्तंभाचा आधार शोधावासा वाटतो, तसेच हलक्या झालेल्या आपल्या मनाला ही आधाराची गरज भासते. सारासार विचाराने एवढेच कळते की, आई आईच्या जागी असते आणि घरही त्याच्या जागेवर ठाम असतं. आपण मात्र ठरवून जागा बदललेली असते आपापली. स्वतंत्र जगण्यासाठी घेतलेले निर्णय दुखाचे तळ गाठतात. तरी आपणचं कसे बरोबर याचे दाखले देताना धन्यता मानतो. कोत्या मनाचे होताना आईचे आईपण, घराचे घरपणं विसरून बेभान होतो. आईचे आणि घरादाराचे अतूट नाते याबद्दल बोलताना घर हे आपले पहिले जग तिथे कोणताही अपराध घडला तर आईसारखा प्रेमळ न्यायाधीश आणि त्यावरची बक्षिसासारखी शिक्षा कळायला बरीच वर्षे जातात. तोपर्यंत जुन्या जाणत्या माणसांची नाळ तुटते जमिनीशी. दूरदूर जातात ती कायमची. आईकडून मिळणाऱ्या संस्काराचे महत्त्व वर्णन करताना कवी फ. मु. शिंदे म्हणतात की,

आई काय असते
तर ती असते लंगड्याचा पाय,
वासराची गाय, धरणीची ठाय,
दुधावरची साय, लेकराची माय.
मंडळी आई असते जन्माची शिदोरी,
जी सरत नाही आणि पुरतही नाही.
आईचे आणि घराचे नाते हे असेच असते. जे जपायचे असते रेशीम धाग्यासारखे. ज्याला जमतं तो कुटुंब वत्सल ठरतो. अन्यथा जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे हे एवढचं म्हणणं आणि मागणं आपल्या हातात उरतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -