दीपक मोहिते
मुंबई : महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे पथक येत्या २७ सप्टें. रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे.दोन दिवसांच्या या दौऱ्यात हे पथक निवडणूकीसंदर्भात आढावा घेणार आहे. त्यांचा हा दौरा संपला कि विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका साधारणपणे नोव्हें. महिन्याच्या मध्यास घेण्यात येतील,असा अंदाज आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षाच्या जागावाटप प्रक्रियेला आता चांगलाच वेग आला आहे.
महायुतीच्या घटक पक्षाचे नेते कितीही दावा करत असले तरी याविषयी होणाऱ्या त्यांच्या मॅरेथॉन बैठकीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण होत आहे. भाजप व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) हे दोघे अजित पवार गटाच्या तोंडाला पाने पुसण्याची एकही संधी सोडत नाही. अजित गटावर महायुतीचे आमदार बाहेर जी जाहीरपणे टीका करत आहेत,ती या दोन्ही पक्षांची रणनिती आहे. अजित पवार गट हा या दोघांनी निर्माण केलेल्या दलदलीत चांगलेच रुतत चालले आहेत. अजित पवार गटाने सर्व विद्यमान आमदाराना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे, पण त्यांना भाजप किती जागा देतील, याबाबत त्यांचे आमदारच साशंक आहेत. ऐनवेळी भाजप, आमचा सर्व्हे या जागा तुम्हाला जिंकणे कठीण आहे, असे सांगतो, असे स्पष्ट करत आमच्या तोंडाला पाने पुसणार अशी भिती ते व्यक्त करत आहेत.त्यांच्या या अशा भितीमध्ये तथ्य आहे.कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी हेच तंत्र अवलंबले होते.त्यामुळे शिंदे गटाच्या चार जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्या.
भाजपच्या अशा चाणक्य नितीमुळे अजित पवार गटाचे अनेक आमदार आता ” सिल्व्हर ओक,” वर दुधाचे रतीब घालू लागले आहेत.पण शरद पवार त्यांचे दूध घाऊक स्वरूपात घेतील,असे वाटत नाही.लवकरच महायुती व महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते हे जागावाटपावर अखेरचा हात फिरवण्याच्या तयारीला लागले आहेत.त्यामुळे राज्याच्या एकूण पाच महसूल विभागात २८८ विधानसभा जागांवर आपण सर्वप्रथम एक नजर टाकूया.
- विदर्भ-६२
- कोकण-७५( कोकण-३९ व मुंबई ३६ जागा )
- उत्तर महाराष्ट्र-४७
- पश्चिम महाराष्ट्र-५८
- मराठवाडा-४६
कोणाची ताकद कुठे आहे ?
- विदर्भ – भाजप व काँग्रेस,काही किरकोळ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस
( शरद पवार गट ), - कोकण – शिवसेना (उबाठा), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भाजप, (तसेच रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचे नाममात्र अस्तित्व आहे,पण हे दोन्ही गट काही जागांसाठी आग्रही आहेत.अजित पवार गटाने रत्नागिरी व संगमेश्वर या दोन जागांवरही दावा ठोकला आहे,पण शिंदे गट त्या द्यायला तयार होणार नाही.) मुंबई शहर,मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भाजप,शिवसेना (उबाठा) शिवसेना (एकनाथ शिंदे) या चौघांचे निर्विवाद वर्चस्व आहे.येथे शरद पवार व अजित पवार गटाला बिलकुल थारा नाही.शरद पवार गटाकडे केवळ कळवा विधानसभा आहे.
- उत्तर महाराष्ट्र -४७ जागा आहेत,येथे भाजप,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) या चौघाचे प्राबल्य आहे.
- पश्चिम महाराष्ट्र-५८,
या विभागात शरद पवार गटाचे सर्वाधिक वर्चस्व असून येथे शरद पवार हे निम्याहून अधिक जागा मागत आहेत.त्यांची मागणी योग्य असून ती महाविकास आघाडी मान्य करेल,अशी शक्यता आहे.इतर विभागात त्यांच्या वाट्याला तीस ते चाळीस जागा येतील.प.महाराष्ट्रात मात्र ते निम्याहून अधिक जागांसाठी आग्रही आहेत.येथे उद्धव ठाकरे देखील ०८ ते १० व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही तेवढ्याच जागा मागतील. येथे अजित पवार यांचा गटही अधिक जागा मागत आहे,पण गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा उडालेला धुव्वा लक्षात घेता भाजप त्यांच्या अवास्तव मागणीला थारा देणार नाही.शिंदे गटाला आठ ते दहा व अजित पवार गटाला दहा ते बारा जागा कबूल करतील,असे दिसते.
- मराठवाडा -४७,
येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व काही मोजक्या तालुक्यात भाजपचा बोलबाला आहे.
यानिवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-९०,शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) -११०,
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट )- ८० व उर्वरित- ०८ जागा अपक्ष असे जागावाटप होण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये भाजप -१४५,
- शिवसेना ( एकनाथ शिंदे गट-८० व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट )-४८ व १० जागा सहयोगी अपक्षांना असे जागावाटप होईल, असे वाटते.