लेझर स्कॅनिंगच्या मदतीने घेणार शोध
पुरी : पंढरपुरमधील विठ्ठलाच्या मंदिरानंतर आता पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या (Jagannatha Temple) तळघरात खजिना दडला असल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) १८ सप्टेंबर रोजी याबाबत तपासणीचा पहिला टप्पा पार पडला होता. तर काल या मंदिरातील दुसऱ्या टप्प्यातील खजिन्याचे तांत्रिक सर्वेक्षण सुरु करण्यात आले. तसेच या रत्न भंडारातील गुप्त तळघरांचे किंवा बोगद्यांचे रहस्य उलगडण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वेक्षणाद्वारे या रचनेचा शोध घेतला जाणार असून याची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. याद्वारे येत्या दोन दिवसांत गुप्त खजिन्याचे रहस्य उलगडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथ पुरी मंदिरातील गुप्त खजिन्याची माहिती मिळताच एएसआय विभागाकडून शोध सुरु झाला. सध्या याबाबतचा शोध सुरु असून याची तपासणी लेझर स्कॅनर्सद्वारे करण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरला हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हे रहस्य उलगडणार आहे.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवणार
या काळात मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दुपारी १ ते सायंकाळी ६ दरम्यान मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. या सर्वेक्षणाच्या काळात भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक अरविंद पाधी यांनी केले.
२४ तारखेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची विनंती
मंदिरात नवरात्रीनिमित्त श्री दुर्गा पूजा २४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे याआधीच गुप्त खजिन्याचे सर्वेक्षण पूर्ण करावे, अशी मंदिर समितीकडून पुरातत्व विभागाला विनंती केली होती.