Sunday, October 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपाॅपकाॅर्न ब्रेन

पाॅपकाॅर्न ब्रेन

आपल्या फोन आणि सोशल मीडियाच्या वारंवार वापरामुळे आपल्या मेंदूने क्षणात एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे जाण्याची प्रवृत्ती विकसित केली आहे. अभ्यासानुसार, आपले मन एका विचारात जास्त काळ राहू शकत नाही आणि अनेक कल्पना आपल्या मनात चालू असतात. विचारांची ही सतत उडी मारणे म्हणजे कढईत पॉपकॉर्न फोडण्यासारखे आहे. म्हणूनच मेंदूला ‘पॉपकॉर्न ब्रेन’ म्हटले आहे.

आनंदी पालकत्व – स्वाती गानू

जसे मशीनमध्ये किंवा कुकरमध्ये काॅर्न टाकले की, इकडून तिकडे उडत असतात तसाच माणसाचा आणि विशेषतः टीनएजर्सचा मेंदू खूप अस्थिर होत चाललाय. त्यालाच पाॅपकाॅर्न ब्रेन म्हणतात. पालकांनो तुमचे मूल या मानसिक स्थितीला, तर बळी पडत नाहीय ना हे जाणून घ्या.

‘पाॅपकाॅर्न ब्रेन’ हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे. ही अगदी वेगळीच संकल्पना आहे. वाॅशिंग्टन युनिव्हर्सिटीतील संशोधक डेव्हिड लेव्ही यांनी २०११ मध्ये ही इनफाॅर्मल टर्म सांगितली. ह्यातून अशी मनोवस्था कळते, दाखवली जाते की सोशल मीडियावर तुम्ही एका माहितीवरून, टाॅपिकवरून क्षणात दुसऱ्या टाॅपिकवर जाता आणि यामुळेच व्याकुळ मनोवस्थेला सामोरे जाता.

सध्याच युग हे ‘डीजिटल युग’ आहे. आपण जो विचार करतो, जे वागतो ते सारे एका प्रचंड बदलातून जात आहे. तंत्रज्ञानाचा आपल्या मेंदूवर आणि आपण मेंदूच्या सहाय्याने जे काम करतो त्यावर खोल, गहन प्रभाव पडत आहे. लक्ष केंद्रित करण्याचा आपला कालावधी कमी होत चालला आहे. एखाद्या गोष्टीत भान हरपून जाण्याची, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत चाललीय आणि आपल्या तणावाची पातळी इतकी वाढत चाललीय की, ती आपल्या नियंत्रणापलिकडची आहे. जितकं वाटतं, दिसतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक डीजिटल माध्यमे आपले नुकसान करत आहेत. जनरेशन झी( Gen Z) मध्ये ‘पाॅपकाॅर्न ब्रेन’(Popcorn brain)ही टर्म लोकप्रिय होत चालली आहे.

‘पाॅपकाॅर्न ब्रेन’सांगतो की, कशी तुमच्याकडे तुम्ही सांभाळू शकत नाही इतकी कामे आहेत आणि वेळ कमी आहे असे ‘मनाचे खेळ’तो करत असतो. एक अशी तातडीची गरज तो निर्माण करतो की प्रत्येक पिंग (ping), अलर्ट तुम्ही पाहायलाच हवा. एकदा का ही सवय लागली आणि जर तुमच्याकडे काम नसले की, तुम्ही इतके अस्वस्थ, व्याकुळ होता की काय करावे या वेळेचे तेच तुम्हाला सुचत नाही. सतत कोणाचे तरी लक्ष आपल्याकडे जावे या मनाच्या मागणीतून निर्माण होणारे ‘डोपामाईन’ हे केमिकल स्त्रवण्यास सुरुवात होते.‘रिवॉर्ड’ मिळेल ही भावना निर्माण करणारे हे केमिकल असते. आज आपल्याला प्रचंड प्रमाणात माहिती मिळत असते. ह्या माहितीचे प्रोसेसिंग करताना आपण त्यात किती खोलवर गुंतून पडतो. ह्या चक्रात किती अडकून पडतो हे आपल्याला कळतही नाही.

या डीजिटल माध्यमातून आणखी हवे हे उद्दीपक (stimuli)मिळते. आणि त्याचा परिणाम होऊन मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी होत जातो. या इंटरनेटमुळे आपलं cognition बदलतंय. खरं म्हणजे सोशल मीडिया आपल्याला एका कामावर फार काळ मन टिकून न राहण्याचे ट्रेनिंग देतंय जणू. आपली सस्टेनिंग पाॅवर दुर्बल होत जाते. आपण कृतिशील म्हणजेच active न राहता पॅसिव्ह मोडवर जातो. कुणीतरी आपले लक्ष जसं काही ‘हायजॅक’ करते. एवढंच नव्हे, तर शिकणे, स्मरण, निर्णयक्षमता, कौशल्य शिकणे, भावनांचे व्यवस्थापन या गोष्टींवर ‘पाॅपकाॅर्न ब्रेन’मुळे प्रभाव पडतो.

पाॅपकाॅर्न ब्रेनची लक्षणे

  • विखुरलेले विचार
  • सातत्याने मन विचलित (डिस्ट्रॅक्ट)
  • काम पूर्ण करण्यात अडचणी
  • मानसिक थकवा
  • इतरांपासून अलग (डिसकनेक्ट) होण्याची भावना
  • एकाग्रता कमी होत जाणे.
  • चिंता वाढणे
  • कमालीचा तणाव
  • हताशा(fatigue)
  • कामावर लक्ष केंद्रित करता येण्याची क्षमता टिकवता न येणं.
  • सतत एका कामावरून दुसरीकडे मन धाव घेते.
  • नोटिफिकेशन आले की, ते पाहण्याची अस्वस्थता.
  • फोन किंवा सोशल मीडिया वारंवार चेक करण्यासाठी तडफड
  • पाॅपकाॅर्न ब्रेनचा नात्यांवर आणि आयुष्याच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतो. स्मरणशक्ती कमी होते, निर्णय घेण्यात अडथळे येतात.

अशा पाॅपकाॅर्न ब्रेनला सांभाळायचे कसे ते मार्ग पाहू या.

  • गरज नसणाऱ्या ॲप्सची नोटिफिकेशन्स ताबडतोब बंद करून टाका.
  • सोशल मीडिया पाहण्याची ठराविक वेळ आणि मोजकाच वेळ मनाशी ठरवून घ्या.
  • झोपण्यापूर्वी फोन दुसऱ्या खोलीत ठेवा.
  • सतत माहिती कानांवर, मनावर डोळ्यांवर येऊन आदळत असते. त्यामुळे आपण लक्ष केंद्रित करण्यात मागे पडत जातो.
  • आपली उत्पादकता कमी होत जाते.
  • यातून वेळेचा अपव्यय होतो. भावना उत्तेजित होतात. लाज, अपराधीपण जाणवत राहतं म्हणून डीजिटल डिटाॅक्स करायला हवे. यामुळे ‘डोपामाईन’ पातळी नियंत्रित राहते. विचारांच्या उडणाऱ्या गोंधळातून आपण बाहेर पडू शकतो.
  • दैनंदिन जीवनातील जगण्याची एक रुपरेषा निश्चित करा. त्यावर लक्ष केंद्रित करा, स्वतःला प्रोत्साहन द्या. नकारात्मक सवयींना लगाम घाला. चांगल्या सवयी प्रस्थापित करा. काही काळ शरीर व मनावर लक्ष केंद्रित करून विधायक, सृजनशील काम करायला स्वतःला प्रवृत्त करा.
  • तुमचा स्वतःचा एका गोष्टीवर किती वेळ फोकस टिकून राहतो ते चक्क स्टॉपवाॅच लावून तपासून पाहता येईल. यावरून मुलांचे आणि तुमचे स्वतःचेही पायाभूत पातळीवरचे लक्ष, एकाग्रतेचा अवधी ठरवता येईल. यातूनच आपल्याला आपल्या ‘पाॅपकाॅर्न ब्रेनला’ नियंत्रित करता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -