कथा – प्रा. देवबा पाटील
त्या दिवशी रात्री जयश्रीचे जेवण जरा जास्तच झाले होते व तिला डुलक्या येऊ लागल्या होत्या. ‘‘आई जेवण जरा जास्तीचे झाले तर आपणास डुलक्या का लागतात?’’ जयश्रीने प्रश्न केला.’’तुला लागतात का शाळेत पहिल्या-दुसऱ्या तासात डुलक्या?’’ आईने विचारले. ‘‘मला नाही गं लागत. पण बऱ्याच मुला-मुलींना कधी ना कधी अशा डुलक्या लागतात व मग सर त्यांना बोलतात. सांग ना आई, खूप जेवल्यावर अशी झोप का येते?’’ जयश्रीने विचारले.
‘‘आपण जेवण केल्यावर ते आधी जठरात, तेथून लहान आतड्यात व नंतर मोठ्या आतड्यात जाते. त्याचे पचन होण्यासाठी त्यावर जठरात काही आम्ले व विकरांची प्रक्रिया होत असते. या पचनाच्या प्रक्रियेसाठी व नंतर अन्नद्रव्यांच्या शोषणासाठी रक्तपुरवठ्याची अत्यंत गरज असते. त्यामुळे या काळात पचनसंस्थेचा रक्तपुरवठा वाढतो. शरीरातील रक्त हे मर्यादित असल्याने पचनसंस्थेला जास्तीचा रक्तपुरवठा करण्यासाठी मेंदू व शरीरातील इतर अवयवांचा रक्तपुरवठा कमी होतो. मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्याने तेथे चयापचयातील टाकाऊ पदर्थांचे प्रमाण वाढते व प्राणवायू नि ग्लुकोजसारख्या शर्करायुक्त पदार्थांचे प्रमाण कमी होते. यामुळे मेंदूच्या पेशींचे काम मंदावते व आपणास डुलकी येते.
विशेषत: सणाच्या दिवशी जास्तीचे गोडधोड पक्वान्नाचे जेवण केले म्हणजे हमखास अशा जेवणानंतर थोड्याच वेळात झोप येते. म्हणूनच तर चांगला अभ्यास होण्यासाठी रात्रीच्या जेवणात दोन घास कमी खावेत.’’ आईने खुलासा केला.
लाडू खाता खाता जयश्री बोलली, ‘‘मग तहानही अशी भुकेसारखीच लागते का गं आई?’’ हो बाळा. आई म्हणाली, ‘‘आपल्या शरीरातील असंख्य पेशींमध्ये एक प्रकारचे द्रव्य असते. या पेशी द्रव्यात व रक्तात पाणी, मीठ व साखर हे घटक असतात. सर्वसामान्य परिस्थितीत या घटकांचे प्रमाण कायम असते. आपल्या शरीरात अनेक रासायनिक प्रक्रिया सतत सुरू असतात. त्या योग्य तऱ्हेने होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी आपल्या शरीरातीलच पाणी वापरले जाते. शरीरातील पाणी कमी झाले म्हणजे पेशी व रक्तातील पाणी त्या प्रक्रियांसाठी वापरले जाते. तशा काही कारणाने जर पेशींतील व रक्तातील या घटकांचे विशेषत: पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास मेंदूतील तहान केंद्राकडे वा तृषा केंद्राकडे तो संदेश जातो. ते केंद्र घशाकडे आदेश पाठवून घशाला उद्दीपित करते. त्यामुळे घशातील स्नायू ताणले जाऊन कोरडे पडतात व घशाचे आवरणही कोरडे पडते नि आपणास तहान लागल्याची जाणीव होते. पाणी पिल्यानंतर पेशींतील व रक्तातील पाण्याचे प्रमाण पूर्ववत होते. ही जाणीव तृषा केंद्राला झाली की आपणास ‘तहान भागली’ असे वाटते.
पाण्यामुळे शरीरातील तापमान कायम राहते. म्हणूनच नेहमी स्वच्छ धुतलेल्या माठातील गार व शुद्ध पाणीच प्यावे. बाहेरची कृत्रिम थंडपेये मुळीच पिऊ नयेत कारण त्या कृत्रिम अतिशीत पेयांनी शरीराचे तापमान सुरळीत राहत नाही. कळले ताई.’’ आईने विचारले.
‘‘हो, कळले गं आई. वैज्ञानिक माहितीसोबत बाहेरचे कोणतेही अन्नपदार्थ खाऊ नयेत, थंडपेये मुळीच पिऊ नयेत. ते शरीराला अपायकारक असतात हेही तुला मला सांगायचे आहे. पण मी बाहेरचे मुळीच खात-पीत नाही.’’ जयश्री म्हणाली.
‘‘मला खात्री आहे बाळा की तू बाहेरचे काहीच खात-पीत नाही. माझी बाळ आहेच तशी गुणाची.’’आई म्हणाली.
‘‘पण आई आपणास आपली भूक आणि तहान यावर नियंत्रण ठेवता येते का, म्हणजे ते रोखता येतात का?’’ जयश्रीने शंका विचारली.
आई म्हणाली, ‘‘आपणास भूक लागली की, लगेच काहीतरी खायला पाहिजे असते व तहान लागली की ताबडतोब प्यायला पाणी पाहिजे असते. त्यामुळे आपणास असे वाटते की, आपण भूक व तहान यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण तसे काही नसते. आपण त्या दोन्हींनाही रोखू शकतो. आपल्या शरीरात जर प्रथिनांचा पुरेसा साठा असला व आपण जर शांत असलो तर शरीरातील प्रथिनांचा साठा बराच वेळ टिकतो व आपण काही तास तरी भुकेवर नियंत्रण मिळवू शकतो; परंतु तहानेवर नियंत्रण मिळवणे जरा कठीणच असते. तरीही आपण रोजच्या सरावाने एखादा तास तरी तहान रोखू शकतो. पण आरोग्याच्या दृष्टीने त्यांना न रोखता वेळच्या वेळी जेवण करावे व दिवसभरातून एकेका तासाचे अंतराने अंदाजे १० ते १२ पेले पाणी प्यावेच.’’
‘‘हो आई.’’असे म्हणून जयश्री आपल्या अभ्यासाला बसली.