विशेष – भालचंद्र ठोंबरे
आपल्या पौराणिक कथानुसार प्रत्येक देवतेचे कोणते तरी एक वाहन असते. उदाहरणार्थ विष्णूंचे वाहन गरुड, लक्ष्मीचे वाहन घुबड, सरस्वतीचे वाहन हंस, कार्तिकेयाचे वाहन मोर, शंकराचे नंदी, यमाचा रेडा, त्याचप्रमाणे गणेशाचेही वाहन उंदीर असल्याचा उल्लेख आहे; परंतु एवढ्या भव्य असणाऱ्या श्रीगणेशाचे वाहन लहान वाटणारा उंदीर कसा याचे अनेकांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. विविध पुराणात गणेशाच्या विविध वाहनांचे उल्लेख आहेत. जसे सिंह, घोडा, नाग, मयूर अशा वाहनांचे उल्लेख आहेत, तर जैन धर्मात उंदीर, हत्ती, कासव, मोर असे वाहनांचे संदर्भ आढळतात; परंतु मुख्यत्वे करून गणेशाचे वाहन उंदीरच मानले जाते. मूषक हा शब्द मुळशी स्त्यैये या संस्कृत धातूपासून बनल्याचे मानले जाते व त्याचा संस्कृतमधील अर्थ चोरी करणे म्हणून गणपती देवता या मूषकाचे अंगी असणाऱ्या दुर्गुणांवर वर्चस्व गाजवून त्याचे दमन करीत असल्याचा संकेत यात आहे.
गणेशाचे वाहन उंदीरच का?
गणेशाचे वाहन उंदीर असल्याच्या संदर्भातल्या दोन अख्यायिका सांगितल्या जातात. एका अख्यायिकेनुसार क्रौंच नावाचा एक गंधर्व एकदा इंद्राच्या सभेत सर्व ज्ञानी ऋषी बसले असताना तेथे आला व त्याचा पाय वामदेव ऋषींच्या पायावर पडला. त्यामुळे ऋषींनी क्रौंचाला उंदीर होण्याचा शाप दिला. क्रौंचाने क्षमा याचना केली तेव्हा त्यांनी त्याला पुढील काळात शिवपुत्राचे म्हणजे गणेशाचे वाहन होशील असा वर दिला. काही ठिकाणी इंद्राच्या सभेत एका गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना क्रौंच अप्सरांशी बोलण्यात गुंग होता हे पाहून इंद्राला राग आला व इंद्रदेवाने त्याला उंदीर होण्याचा श्राप दिला. असाही उल्लेख आहे. क्रौंच साधा उंदीर नव्हता. तो मोठमोठाले डोंगरही क्षणात पोखरुन टाकत असे. तो जंगलात ऋषीमुनीनांही त्रास देत असे. त्याने पाराशर ऋषींची झोपडीही नष्ट केली. तेव्हा पाराशर ऋषींनी श्रीगणेशाकडे या त्रासातून वाचवण्यासाठी साकडे घातले. श्री गणेशाने आपला फास टाकून उंदराला पकडले व तू माझ्या आश्रयास आहेस तुला काही मागायचे असल्यास माग म्हणून सांगितले; परंतु मला काही नको तुलाच काही हवे असल्यास माग असे उंदीर गर्विष्ठपणे म्हणाला. तेव्हा गणपतीने त्याने आपले वाहन होण्याची इच्छा प्रगट केली. उंदराने ती मान्य केली. पण गणेशाचे वजन पेलून त्याला पुढे चालणे अशक्य झाले. त्यामुळे त्याचे गर्वहरण झाले तेव्हा श्री गणेशाने आपला भार थोडा कमी करून त्याचे चालणे सुसह्य केले. अशाप्रकारे उंदीर गणेशाचे वाहन झाला.
दुसऱ्या अख्यायिकेनुसार श्रीगणेशाचे व गजमुखासूर नावाच्या राक्षसाचे युद्ध झाले. कोणत्याही शस्त्राने मरण न येण्याचा वर गजमुखासुराला मिळाला होता. म्हणून गजाननाने त्याच्यावर एका दाताने हल्ला केला. गजमुखसूर उंदीर होऊन पळत जात असताना गजाननाने त्याला फास टाकून बंदिस्त केले. आणि त्याला आपले वाहन करून त्याचा उद्धार केला.