Sunday, October 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘हाफिज खुदा तुम्हारा...’

‘हाफिज खुदा तुम्हारा…’

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

अस्पी इराणी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शिरी-फरहाद’(१९५६)मध्ये प्रमुख भूमिकेत होते. मधुबाला, प्रदीपकुमार आणि सहकलाकार अमिता, पी.कैलास, बेला बोस, राम अवतार, उमा दत्त, आशाबाई, लीला.

एका पर्शियन दंतकथेवर आधारित या प्रेमकथेत छोटी शिरी एक राजकन्या आहे. ती एक हरणाचे पिल्लू पाहते. तिला ते खूप आवडते. ते विकत घेऊन ती घरी येते. ते ज्या फरहाद नावाच्या मुलाचे असते त्याला तिने महालात येऊन त्या पिलाशी खेळायची परवानगी दिलेली असते. रोज महालात आल्यामुळे त्याची राजकन्येशी घट्ट मैत्री होते. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. हे शिरीच्या वडिलांना कळताच ते संतापतात. एका मामुली शिल्पकाराचा मुलगा राजकन्येशी लग्नाची इच्छा कशी बाळगू शकतो असे वाटून ते त्याला मृत्यूदंड देण्याच्या विचारात असतात.

शिरी गयावया करून, वडिलांच्या पायावर लोळण घेऊन त्याच्या प्राणांची भिक्षा मागते. वडील तिला एक अट घालतात.‘मी सांगेन त्याच्याशी तू बिनतक्रार लग्न केलेस’, तर मी त्याला जिवंत राहू देईन असे ते धमकावतात. अशा रितीने शिरीचे लग्न शहेनशाह हुसरोशी ठरते आणि फरहादला देशाबाहेर घालवले जाते.

शिरी राजाशी विवाह करण्यास इच्छुक नसल्याने तिचे वडील राजाला सांगतात की, तिची लग्नासाठी एक अट आहे. तेहरानजवळचा पहाड फोडून तुम्ही दुधाच्या झऱ्याचा प्रवाह तिच्या राजवाड्यापर्यंत आणला तरच ती लग्नाला तयार होईल.

इकडे शिरीच्या प्रेमात वेडा झालेला फरहाद परागंदा होऊन वाळवंटात फिरत असतो आणि शिरीने भावी पतीच्या महालात अन्नत्याग केलेला असतो. राजाने खूप मनवल्यावर ती म्हणते ‘माझी अट पूर्ण केली, तर मी अन्नग्रहण करेन.’ फिल्मी योगायोगाने फरहाद राजाकडून हे आव्हान स्वीकारून डोंगर फोडून दुधाचा झरा राजवाड्याकडे आणतो. राजाने त्याला बक्षीस म्हणून जे मागशील ते देण्याचे वचन दिलेले असते. आता तो शिरीलाच मागणार याची राजाला कल्पना आल्यामुळे राजा कुटीलपणे त्याला ‘शिरीने आत्महत्या केली आहे’ असे कळवतो. अतिदु:खाने बिचारा फरहाद आत्महत्या करतो. मग त्याच्या मृत्यूची बातमी कळल्याने शिरीही कड्यावरून उडी मारून जीव देते.

सिनेमाच्या शेवटी दोघांच्या आकृती हातातहात घालून शांतपणे स्वर्गाच्या पायऱ्या चढताना दाखवून सिनेमा सुखात भासवण्याचा प्रयत्न केला होता. या शोकांतिकेवर पूर्वी याच नावाचा सिनेमा १९३१ साली आला होता. त्यावर्षी आलेला ‘आलमआरा’ हा हिंदीतला पहिला बोलपट ठरला तसा हा ‘शिरी फरहाद’ देशातला दुसरा बोलपट ठरला!

नंतरच्या १९५६ सालच्या शिरी फरहादमध्ये एक सुंदर गाणे होते. जेव्हा शिरीचे वडील तिच्या इच्छेविरुद्ध तिला भावी पतीकडे पाठवतात त्यावेळी ती हे गाणे फरहादला उद्देशून म्हणत असते. तन्वीर नक्वी यांनी लिहिलेल्या आणि लतादीदीने त्यांच्या तत्कालीन कोवळ्या, काहीशा अनुनासिक आवाजात गायलेल्या गाण्याचे संगीत होते एस. मोहिंदर यांचे. शब्द होते-

“गुजरा हुवा जमाना,
आता नही दुबारा,
हाफिज खुदा तुम्हारा…”
आता फरहादला पुन्हा भेटणे शक्य नाही, हा निरोप शेवटचाच या विचाराने शिरी अस्वस्थ आहे. तिची देवाकडे प्रार्थना आहे ‘देवा, माझ्या प्रियकराला माझा विरह असह्य होईल. त्यामुळे आता तूच त्याचे रक्षण कर.’

या जुन्या गाण्याचे एक वैशिष्ट्य असायचे. ती सिनेमातल्या कथानकातील प्रसंगानुरूप लिहिलेली असली तरी श्रोत्यांना सिनेमाबाहेरच्या जीवनातही खूप काही देऊन जायची. ‘गुजरा हुवा जमाना आता नाही दुबारा’ हे प्रत्येकाचेच दु:ख असते तसेच कुणीतरी आयुष्यातून कायमचे गेल्याची खंत प्रत्येकाला असते. तो चेहरा आठवून ‘हाफिज खुदा तुम्हारा’ हे शब्दच म्हणायला हवेत असे नाही पण ती भावना सर्वांनी अनुभवलेली असते. म्हणूनच ही गाणी वर्षानुवर्षे मनावर राज्य करतात.

शिरीने बालपणीचा जो काही काळ प्रियकराबरोबर घालवायला मिळाला तेच तिच्या आयुष्यातले चार सुखाचे क्षण होते. आता आयुष्यभर दु:खच भोगावे लागणार आहे; म्हणून ती म्हणते ‘यापुढे माझ्या नशिबात फक्त गेलेल्या दिवसांची आठवण करून अश्रू ढाळनेच लिहिले आहे.’

‘खुशियाँ थीं चार पलकी,
आँसू हैं उम्र भरके,
तन्हाइयोंमें अक्सर,
रोएंगे याद करके,
वो वक्त जो की हमने,
इकसाथ है गुजारा
हाफिज खुदा तुम्हारा…’
प्रियकराला मनातल्या मनात निरोप देताना तिच्या मनात एक खंत आहे. आपण कोणत्या परिस्थितीत या लग्नाला तयार झालो हे माहित नसल्याने फरहादला आपण त्याचा विश्वासघात केला असे वाटेल ही चिंता तिला सतावते. म्हणून ती म्हणते, ‘मला चुकूनही विश्वासघातकी समजू नकोस. माझे प्रेम अगतिक झाले होते. केवळ निरुपाय म्हणून मला जावे लागत आहे. तुझ्यापासून ताटातूट म्हणजे माझ्या जीवनातला शेवटचा आधार गमावणेच आहे. पण मी काय करू तुझ्या जीवाला काही होऊ नये म्हणून हे सगळे करावे लागत आहे. जुन्या काळी अनेक प्रेमकथा इतक्याच निर्दयपणे संपवल्या जात, संपत. शेवटचा संवाद, निरोप कधीच घेता येत नसे. ती रुखरुख पुढच्या कडव्यात व्यक्त होते.

‘मेरी कसम है मुझको,
तुम बेवफा न कहना.
मजबूर थी मुहब्बत,
सब कुछ पडा है सहना.
तुटा है जिन्दगीका,
अब आखिरी सहारा
हाफिज खुदा तुम्हारा…’
शिरीला फरहादशिवाय जगणे म्हणजे मरण वाटते. ती म्हणते, ‘आता जीवनात केवळ अंधारच अंधार असणार. दिवसाची सुरुवात होते ती पहाटसुद्धा माझ्यासाठी रात्रच बनली आहे. माझी वरातसुद्धा माझी प्रेतयात्रा बनलीये.’

पुढच्याच क्षणाला तिला जाणीव होते की, मला असे जबरदस्तीने राजाकडे पाठवले जाताना फरहादने पाहिले, तर त्याने दु:खाने प्राणच सोडला असता. बरे झाले की, आता हे दृश्य पहायला तो इथे नाहीये.

मेरे लिये सहर भी,
आई है रात बनकर.
निकला मेरा जनाजा,
मेरी बरात बनकर.
अच्छा हुआ जो तुमने,
देखा न ये नजारा
हाफिज खुदा तुम्हारा…
नॉस्टॅल्जिया म्हणजे मनाने जुन्या काळात जाण्याचा प्रयत्न करणे. जुन्या आठवणीत रमणे. त्या स्मृती आनंददायक असोत की दुःखद, काळाचा पडदा पडल्यावर सुखदच झालेल्या असतात. हिंदीत म्हणतात ना-‘यादे हमेशा सुहानी होती हैं.’ असे जुन्या काळाला मनाने पुन्हा भेट देणं का आवश्यक बनतं? कारण ते अनुभव पुन्हा घेणे अशक्य असते. म्हणून काल्पनिक पातळीवर त्या सुहृदांना भेटणं, त्यांची आठवण करणेही सु:खद बनून जाते. म्हणून तर अशी जुनी गाणी ऐकायची.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -