मुंबई : सोने आणि हिऱ्यांची तस्करी प्रकरणी मुंबईत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त केले, ज्यात सोन्याची किंमत अंदाजे १.५८ कोटी रुपये आणि हिऱ्यांची किंमत १.५४ कोटी रुपये आहे. या प्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त (Gold Seized) करण्यात आला आहे.
मुंबई सीमाशुल्क विभागाने पहिल्या प्रकरणात, दुबईहून मुंबईत येणाऱ्या एका संशयीत प्रवाशाला थांबवण्यात आलं आणि त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यात २४ कॅरेट सोन्याचे १२ बार (एकूण वजन १४०० ग्रॅम), अंदाजे किंमत ९७,००,२३६ रुपये आहे. हे सोने प्रवाशाने पॅन्टच्या बेल्टजवळ लपवले होते.
चौकशी दरम्यान प्रवाशानं सांगितलं की, हे कृत्य त्याच विमानामधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाच्या सांगण्यावरून केलं आहे. सहप्रवाशानेही आपल्या निवेदनात हे मान्य केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात, हाँगकाँगहून मुंबईकडे येणाऱ्या एका प्रवाशाला थांबवून त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये दोन २४ कॅरेट सोन्याच्या बांगड्या (एकूण वजन ८८६ ग्रॅम, किमतीचे ६१,३८,८६४ रुपये), रोलेक्स घड्याळ (१३,७०,५२० रुपये किमतीचे) होते. तर १,५४,१८,५७५ रुपये किमतीचे हिरे जप्त करण्यात आले. सोने, रोलेक्स घड्याळ प्रवाशाने परिधान केले होते, तर हिरे प्रवाशाने परिधान केलेल्या बनियानच्या आत एका विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवले होते. या प्रकरणी त्या प्रवाशाला अटकही करण्यात आली आहे.