Sunday, October 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआयुष्याची संध्याकाळ...

आयुष्याची संध्याकाळ…

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

आयुष्याच्या प्रवासात बालपण, तरुणपण, म्हातारपण या तीन जीवनाच्या अवस्था येतात. प्रत्येक अवस्थेत लक्षणीय परिणाम असतातच हे कटू सत्य. हे बदल वयोपरत्वे स्वीकारावेच लागतात. त्या त्या वयात ती गोष्ट अटळ असतेच. सुख दुःख लपंडाव करत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अवतीभवती कुटुंबात, समाजात प्रत्येक व्यक्तीला समजून वागावे लागते. हे वर्तन तो त्याला वयानुकूल करतो. उदा. बोबडे बोल, मस्ती, भीती, उनाडपणा, गमती, खेळ बालवयामध्ये करतच असतो, तर फॅशन, चैनबाजी, व्यसन, कष्ट, जबाबदारी, ओझं हे सारं तरुणपणी निभावतो. यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे वृद्धापकाळ. या काळात शारीरिक बदलांना सामोरे जावे लागते आणि न झेपेल तितकं त्याला सोसावं लागतं.

अहो ही तर आयुष्याची संध्याकाळ पण ती सुद्धा परावलंबित्व. होतं काय वेळ, पैसा असला तरी नसते ती शक्ती! त्यामुळे अवतीभवती आपली दखल घेणार कोणीतरी पाहिजे असतं आपल्याशी बडबड करणारं, सहवास द्यावा, आपल्यासाठी विशेष वेळ द्यावा, सगळ्यांनी आपलंच ऐकावं अशा त्यांच्या अपेक्षा असतात. एकीकडे सोबतीत किंवा बिना सोबतीमध्ये भीती, ओझं,आजार, दुःख या साऱ्या गोष्टी सतत भेडसावत राहतात. कारण सोबतीचा साथी सोडून गेलेला असतो तो विरह. असे एक ना अनेक प्रश्नच प्रश्न. पिढ्यांमधील गॅप, आपण आयुष्यात काढलेल्या खस्ता, घेतलेले निर्णय, संघर्ष, अपेक्षांचे ओझं, अपूर्ण स्वप्न, सहवास यामुळे यश-अपयश कुरवाळीत. पण निवृत्तीनंतर किंवा साठीनंतर पथ्यपाणी, औषध, आजारपण, मानसिक, शारीरिक थकवा, संगोपन या सगळ्या गोष्टी उतारवयात सुरू होतात.

संयम, शांती आणि आनंद शोधावे लागतात. उत्साह, प्रसन्नता कुठून आणावी. एखादं नातं सुंदर असेलच! असावं पण तिथे हक्काने विसावा, सुख-दुःख वाटायला पाहिजे. मनापासून आपलेपणा वाटला पाहिजे. यावर फार मोठा उपाय आहे. मनस्थिती… ही मनस्थिती प्रसन्न असणे फार गरजेचे असते आणि आहे. त्यात आपण पुढच्या पिढीबरोबर तडजोड करून सामंजस्याने वागणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ लोकं थोडीशी उतारवयामध्ये वयोमानानुसार निरर्थक बडबड करू लागतात. कधी अनियमितता असते. कधी अस्वस्थता असते. काहींचे हळवे मन असते तर ती संवेदनशीलता वाढीस लागते. त्यातूनच धुंद लहरी, हट्टी, जिद्दी असे एकूण पाहावयास मिळतात. तर कधी मनाचे दुबळेपण त्यामुळे हे वृद्ध अधिकाधिक क्षीण होऊन जातात. त्याचा परिणाम मन आणि शरीर होत जातो. यातून उद्भवणारे आजार गंभीर असतात. आजवर सोसलेल्या संघर्ष आणि खस्तांनी ते खचलेले असतात. आयुष्यात खूप काही जमवलं तरी खूप काही गमावलेलं असतं. हा विसरभोळेपणा किंवा पुन्हा पुन्हा तीच तीच गोष्ट बोलणे, मोठ्याने ओरडणे, बधिरपणा, हळवेपणा आणि उतार वयामध्ये ही अस्वस्थता जास्त वाढते. पिकलेल्या पानाने पालवी फुटलेल्या झाडाकडे पाहिले आणि म्हटले सावर रे! पिकल्या पानाने पालवी फुटलेल्या झाडाकडे पाहिले आणि म्हटले माझे जगायचेच राहिले!

आता तू माझं बालपण, स्मरण पूर्ण कर. माझी स्वप्न आणि मला सोबतीचा हात दे. जोवर आहे तोवर असं सारंच काही मागितले. त्या जीर्ण हातांनी कोवळ्या हातामध्ये तेच सोबत मागितली. माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर आणि तुझ्यातच मी मला शोधतो असे देखील सांगितले. चार दिवस मला आनंदाने काढताना माझी भ्रांत मनस्थिती तू समजून घे. ही आयुष्याची शोकांतिका प्रत्येकाच्या प्रवासामध्ये आयुष्यात पाहायला मिळते आणि थकल्या भागल्यानंतर तर डोळे, शरीर, मन, अवयव सारं शिथिल झालेले असते. काही सोसत नसतं आणि त्या वेळेला मात्र कुणाची तरी मायेची ऊब असावी. चार जिव्हाळ्याचे शब्द, आपुलकीची माया अशी मायेची सावली मिळावी. अशी अपेक्षा प्रत्येक माणूस आपल्या पुढच्या पिढीकडून करत असतो. आयुष्याच्या संध्याकाळी ही वृद्ध मंडळी शरीर थरथरत आणि मन मात्र लवलवत असले की, आपलेपणाची, हक्काची माणसंही परकेपणाचा चटका देऊन जातात. त्यामुळे अशी माणसं भेदरलेली असतात.

आयुष्यातील प्रत्येक वळणावर दचकणे, भयभीत होणे असेच काहीसे होऊन जाते. क्षणभंगुर असते जीवन शाश्वत काहीही नसतं. मृत्यूचे भय, उद्याची चिंता, भान हरपलेले किंवा बेभान झालेले आपल्याच धुंदीत.

यावर उपाय म्हणजे ज्येष्ठ नागरिक कट्टा वाचनासाठी भरपूर पुस्तके, पुरवठा, सत्संग, नामस्मरण, सहली, ज्येष्ठांसाठी विविध खेळांचे आयोजन, चिकित्सा तपासण्या, गप्पाटप्पा तसेच समकालीन, एकाच वयोगटातील असल्याने साधारणतः आपल्या आजूबाजूला ही अशी माणसं असतील तर निश्चित त्यांचा विचार करून आपण तसे वागूयात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -