Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीEknath Shinde : आपलं ठाणं, विकासाचं खणखणीत नाणं!

Eknath Shinde : आपलं ठाणं, विकासाचं खणखणीत नाणं!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्गार

ठाणे : महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन (Growth Engine) आहे. तर “आपलं ठाणं विकासाचं खणखणीत नाणं आहे” असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ‘ठाणे विकास परिषद-२०२४’ चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आपण मुंबई महानगर प्रदेशात पाच सेक्टर्समध्ये जर धोरणात्मक काम केले तर आपली अर्थव्यवस्था दीड ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता या मुंबई महानगर प्रदेशात आहे. यामुळे सर्वांना उद्योग, सर्वांना रोजगार, सर्वांना घरे, हरित ठाणे अशा सर्व गोष्टी साध्य करु शकतो. ठाण्यामध्ये काही गोष्टी सुरु होतात, मग नंतर त्या इतर सर्व ठिकाणी सुरु होतात, असा हा ठाण्याचा इतिहास आहे. महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होईल, इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे.

ते म्हणाले, शेतीनंतर रिअल इस्टेट जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे. महाराष्ट्र आता जीडीपी मध्ये, परदेशी गुंतवणूकीत, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात अशा विविध क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. देशाची जी एकूण गुंतवणूक आहे,त्यापैकी ५२ टक्के ही एकट्या महाराष्ट्राची आहे. अटल सेतू मुळे आपण आता मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त २० मिनिटात करू शकतो. या प्रकल्पाबाबत आधी फ्लेमिंगो पक्षी नाहीसे होतील अशी टीका करण्यात आली. मात्र पर्यावरण विषयक काम करर्णाया संस्थांनी प्रत्यक्षात फ्लेमिंगोंची संख्या दुप्पट झाल्याचा अहवाल दिला आहे. अटल सेतू हा मार्ग एक गेम चेंजर प्रकल्प ठरला आहे. समृध्दी महामार्गामुळे ८ तासात आपल्याला नागपूरला पोहोचता येते.

लवकरच ठाणे ते बोरिवली प्रवास आपण २० मिनिटात करू शकणार आहोत. ईस्टर्न फ्री वेचा विस्तार करण्यात येत आहे. विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरु होत आहे. असे विविध प्रकल्प साकारताना, विकासकामे करताना जास्तीत जास्त प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम लवकर पूर्ण होणार आहे. पालघरला तिसरे विमानतळ तयार करीत आहोत. आपल्याकडे उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी असल्यामुळे उद्योग आपल्या राज्यात येत आहेत. दाओसला जावून १ लाख ३७ कोटींच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. त्यातील बहुतांश उद्योगांचे कामही सुरु झाले आहे. ३ लाख ५० हजार कोटींच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. नुकताच इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर चीप बनविण्याचाही प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. लवकरच इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर चीप बनविण्याच्या प्रकल्पासाठी ८४ हजार कोटींचा करार होतोय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पॉवर, स्टील, औषध निर्माण अशा विविध क्षेत्रातील उद्योग येत आहेत. उद्योग क्षेत्रातील कोणतीही तक्रार येता कामा नये. माझ्याकडे तक्रार आलीच तर मी त्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करतो. राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले तर राज्याची प्रगतीही
गतीने होईल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे की, ज्याने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीला विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राज्याला तर ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. आपण विकासाची वर्गवारी केली आहे. त्यामुळे आपल्या राज्याचा विकास जलद होणार आहे. हे शासन विकासाला चालना देणारे आहे. ठाणेमधील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या इमारतींमधील सर्वांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हक्काचे घर देण्याचे काम सुरु केले आहे. सिडको आणि ठाणे महानगरपालिका हे काम करीत आहे. पहिल्या टप्प्यातील १७ हजार घरे बांधण्याचे काम वेगाने सुरु आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पर्यावरण रक्षणाबद्दल मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेने 1 लाख 25 हजार झाडे लावली आहेत. 21 लाख हेक्टरमध्ये बांबू लागवड करीत आहोत. बांबू हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो. त्यामुळे बांबू लागवड पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त सिद्ध झाला आहे. आपल्या सर्वांना पर्यावरणाचे संतुलन राखावे लागेल, ही काळाची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकार करावयाचे असेल तर नीती आयोगाच्या अहवालातील सूचनांप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. याबाबतीत “मित्रा” संस्थेने पुढाकार घेवून त्याप्रमाणे दिशा देण्याचे काम केले आहे. ठाणे जिल्हयाची ४८ बिलियन डॉलर अर्थव्यवस्था आहे, सन २०३० पर्यंत ती १५० बिलियन डॉलर होणे हे आपले उद्दिष्ट आहे. ठाण्याचा जीडीपी ७.५ टक्के आहे, हा जीडीपी २० टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठाण्यामध्ये विविध लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातूनच खड्डेमुक्त रस्ते, सेंट्रल पार्क, ब्लू सी, एसटीपी प्लँट, प्रदूषणमुक्त पाणी यासारखे विविध उपक्रम सुरु आहेत, असे सांगून ते म्हणाले की, विकास आणि कल्याणकारी योजना राबविणारे तसेच राज्याच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अहोरात्र काम करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील उद्योजक, विद्यार्थी, अधिकारी आणि सामान्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -