दीपक मोहिते
मुंबई: जातीपाती व धर्माचे राजकारण करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या या दळभद्री राजकारणाने आता चांगलेच अडचणीत आणले आहे. मराठा विरुद्ध ओबीसी व आदिवासी विरुद्ध धनगर,या समाजामध्ये भिंती उभारण्याचे काम,ज्या नेत्यांनी केले त्यांना लोकसभा निवडणुकीत विशिष्ट समाजाने चांगलाच हिसका दाखवला होता. त्या दणक्यानंतर तरी हे दळभद्री राजकारणी आपल्या वागण्यात सुधारणा करतील,अशी अपेक्षा होती. पण अंतरवाली सराटी व वडगोद्री या गावात तसेच मुंबईतील धारावी येथे जे काही चालले आहे,ते दंगलीना आमंत्रण देण्यासारखे आहे.
वास्तविक रस्ते बंद करणे,दगडफेक करणे,असे प्रकार करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. पण गृहखात्याने त्यांना तमाशाई बनवून ठेवले आहे. धनगर समाजाने देखील आंदोलन छेडल्यामुळे राज्यातील आदिवासी संघटना आता धनगर समाजाविरोधात एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत. बोईसर पूर्व भागात चिल्हार फाटा येथे या संघटनांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. समाजात तेढ निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याला सरकारने वेळीच आवर घातला नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
कोण गुलाबी जॅकेट्स घालून मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इव्हेंट्स करण्यात मश्गुल आहेत. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री हे केवळ बघ्याची भूमिका घेत फुकटचे सल्ले देत फिरत आहेत. राज्याची प्रशासकीय यंत्रणा पार कोलमडली असून कोणाचा पायपोसं कोणाच्या पायात नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या राजकारण्यांनी मग ते सत्ताधारी असोत की विरोधक, त्यांनी कितीही पैशांची खिरापत वाटली तरी मतदार या निवडणुकीत या मतलबी नेत्यांना नक्कीच बाय बाय करणार आहेत.