Monday, October 7, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलआनंदनाथ महाराज स्थापित श्री स्वामी समर्थ मठ

आनंदनाथ महाराज स्थापित श्री स्वामी समर्थ मठ

कोकणी बाणा – सतीश पाटणकर

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीत फार फार मौल्यवान रत्ने, श्रीस्वामी कृपेनेच लाभलेल्या अपार तेजाने तळपताना दिसतात. या अनर्घ्य रत्नांपैकी, एक अलौकिक विभूतिमत्व म्हणजेच, सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज हे होत. श्री आनंदनाथ महाराज हे तळकोकणातील वालावल गावचे, म्हणून त्यांचे नाव पडले वालावलकर. पुढे ते वेंगुर्ले कॅम्प परिसरात स्वामी महाराजांचे मंदिर बांधून राहू लागले.

श्री स्वामी महारांजांचे श्रेष्ठ शिष्य सद्गुरू आनंदनाथ महाराज ह्यांची पवित्र संजीवन समाधी येथे आहे. शिर्डीच्या साईनाथांना जगतासमोर आणण्याच्या कार्यात ह्यांचा मोलाचा सहभाग होता. श्री आनंदनाथ महाराजांना परब्रह्म श्री स्वामीराजांनी आपल्या मुखातून खाकरून ज्या आत्मलिंग पादुका दिल्या होत्या. त्या ह्याच मठात आहेत. या मठात गेल्यावर प्रत्येक स्वामीभक्ताचे अष्टभाव जागृत होतात म्हणजे होतातच कारण परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच आज्ञेने हा मठ आनंदनाथ महाराजांनी स्थापन केला आहे.

वेंगुर्ला म्हणजे श्री आनंदनाथ महाराजांच्या तपश्चर्या साधनेने सिद्ध केलेली तपोभूमी आहे. श्री स्वामी गुरुस्तव स्तोत्र, श्री स्वामी चरित्रस्तोत्र, आत्मबोधगीता, भजनानंद लहरी, स्वामी समर्थ स्तवनगाथा (२७०० दिव्य अभंगांसहित) अशा स्वामी कृपेने भरलेल्या अद्भुत दिव्य रचनांची निर्मिती करून संजीवन समाधिस्थ झाले. महत्त्वाची विलक्षण गोष्ट म्हणजे विख्यात चित्रकार शेखर साने यांनी श्री स्वामींचे तैलचित्र वेंगुर्ले मठाला अर्पण केले आहे आणि ते गर्भगृहात पूजाविधीसाठी स्थापन करण्यात आले आहे.

श्री स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून श्री आनंदनाथ महाराज अक्कलकोटी दर्शनासाठी निघाले. इकडे श्री स्वामी माऊलीलाही आपले लाडके लेकरू कधी एकदा भेटते असे झाले होते. म्हणून श्री स्वामीराज महाराज स्वत:च अक्कलकोटबाहेर येऊन एका झाडावर वाट पाहत बसले होते. श्री आनंदनाथ महाराज नेमके तेथेच येऊन जरा विसावले. झाडावरून उडी टाकून श्री स्वामीराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना खूण दाखवली. आपली साक्षात परब्रह्ममाऊली समोर उभी राहिलेली पाहून श्री आनंदनाथांनी गहिवरून त्यांचे श्रीचरण हृदयी कवटाळले. श्री स्वामीरायांनीही आपल्या जन्मजन्मांतरीच्या या लाडक्या निजदासाच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून पूर्ण कृपादान केले. तसेच तोंडातून कफाचा बेडका काढून त्यांच्या ओंजळीत टाकला. त्या बेडक्यात इवल्याशा श्रीचरणपादुका स्पष्ट दिसत होत्या. हेच श्री स्वामी महाराजांनी श्री आनंदनाथांना प्रसाद म्हणून दिलेले आत्मलिंग होय. आजही ते दिव्य आत्मलिंग वेंगुर्ले येथे नित्यपूजेत असून दर गुरुवारी भक्तांना त्याचे दर्शन मिळते.

श्री आनंदनाथांनी जवळपास सहा वर्षे अक्कलकोटात श्री स्वामी सेवेत व्यतीत केली व नंतर श्रीस्वामी आज्ञेने ते प्रचारार्थ बाहेर पडले. येवल्याजवळ सावरगांव येथेही त्यांनी आश्रम स्थापन केला. मात्र पुढे ते वेंगुर्ले येथेच स्थायिक झाले. शिर्डीच्या श्री साईबाबांना सर्वप्रथम, जगासमोर आणण्याची श्री स्वामीरायांची आज्ञा श्री आनंदनाथांनी पूर्ण केली. साईबाबा हा साक्षात हिरा आहे, हे त्यांनीच प्रथम लोकांना दाखवून दिले. श्री आनंदनाथ महाराज हे सिद्धहस्त लेखक व कवी होते. त्यांच्या श्री स्वामी महाराजांवरील अप्रतिम रचना स्तवनगाथामधून प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे श्रीगुरुस्तवन स्तोत्र तर असंख्य स्वामी भक्तांच्या नित्यपठणात आहे. त्यांनी रचलेला श्री स्वामीपाठ देखील प्रासादिक असून स्वामीभक्तांनी नित्यपठणात ठेवावा इतका महत्त्वाचा आहे. आपल्या दोन हजारांहून जास्त अभंग रचनांमधून त्यांनी श्री स्वामीस्वरूप व श्री स्वामीनामाचे अलौकिक माहात्म्य सुरेख, भावपूर्ण आणि मार्मिक अशा शब्दांत स्पष्ट करून सांगितलेले आहे.

आनंदनाथ महाराज आपल्या या अभंगात सांगतात की, बाबांनो तुम्ही इतरत्र कुठेही फिरू नका, कुठेही भटकू नका. कुणाच्याही सांगण्याला भुलू नका. तुम्हाला स्वतःचे कल्याण साधायचे असेल तर फक्त आणि फक्त माझ्या स्वामींना शरण जा. बस्स! एवढ्यानेच तुमचे कल्याण होईल. बाकी काहीही करायची व कुठेही जायची गरज नाही.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -