मोखाडा : आजच्या आधुनिक युगातही पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलांवर, पत्र्यांवरही ठेवले जातात. पिढ्यानपिढ्या या प्रथा परंपरेचा उलगडा होत नसला तरी हा पितृपंधरवडा मात्र मोठ्या श्रध्देने प्रत्येक घरात तसेच खेड्यापाड्यात आजही कायम पाळला जातो. पितृपंधरवडा व्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही फारशी आठवण येत नाही. मात्र या दिवसांत त्यांची काव काव ऐकण्यासाठी आणि आपण ठेवलेल्या नैवेद्यामध्ये कावळ्यांनी चोच लावण्यासाठी त्यांची तासनतास घरांच्या छतावर वाट पाहिली जाते.
गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसात आपल्या पूर्वजांनी नैवेद्य (वाडी) ठेवण्याची फार जुनी रूढी-परंपरा जुन्या काळापासून आजही चालत आलेली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मानली जाते. तसेच शहरी भागातही ठिकठिकाणी ही परंपरा राखली जाते. या दिवसात पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या आवडीचे खाद्यपदार्थ कावळ्यांच्या नावाने वाढण्याची जुनी परंपरा आहे. पितृ पौर्णिमेला या परंपरेचा प्रारंभ होतो आणि पितृ अमावस्येला त्याची सांगता केली जाते.
या पितृपंधरवड्याच्या दरम्यान आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार वाडी ठेवण्याची प्रथा परंपरा असल्याने या दिवसांत कावळ्यांना अधिक महत्व प्राप्त होते. कावळ्याने जर नैवेद्य घेतला नाही किंवा घेण्यास उशीर झाला तरी घरातील कुणीही माणसे जेवत नाहीत. आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. एरव्ही उकिरड्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पितृपंधरवड्यात खाऊन सुतावलेला दिसून येतो. मात्र सद्यस्थितीत कावळ्यांची संख्या कमी झालेली दिसून येते. पितरांच्या वाडीला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत.
पितृपंधरवडा होताच कावळ्यांचे सुगीचे दिवस सुरु
“ कावळा हा पक्षी इतर वेळी उपद्रवी, अस्पृश्य समजला जातो. उकिरड्यावर आपले खाद्य शोधणारा, मेलेले प्राणी खाणारा कावळा सहसा कुणालाच आवडत नाही. त्याचे ओरडणे कर्कश असल्याने त्यांना लोकांकडून तुच्छेतेची वागणूक मिळते. मात्र याच कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की सुगीचे दिवस येतात हे ही तितकेच खरे आहे.”