तिसरी आघाडी विधानसभा निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. या आघाडीचे नेतृत्व तीन असंतुष्ट आत्मे करत आहेत.
दीपक मोहिते
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडी मध्ये रणकंदन सुरू झाले आहे. या दोघांकडून कितीही दावे करण्यात येत असले तरी ५० ते ६० जागांवर हमरी-तुमरी सुरू झाली आहे. अशी स्थिती असताना आता तिसरी आघाडी या कुरुक्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. या आघाडीचे नेतृत्व तीन असंतुष्ट आत्मे करत आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी, दिव्यांगाचे नेते बचू कडू व मराठा समाजाचे नेते संभाजी राजे यांनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीने या तिघांना फारसे महत्व न दिल्यामुळे त्यांनी आता तिसरी आघाडीची निर्मिती केली आहे. हे तिघेही विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित असल्यामुळे त्यांची आगामी विधानसभा निवडणुकीत डाळ शिजणे कठीण आहे.
संभाजी राजे हे राज्यसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीही मागितली होती. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना आमच्या पक्षातुन निवडणूक लढवा, अशी अट घातली. त्यावेळी संभाजीराजे यांचा अहंकार आडवा आला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना नकार दिला. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना अशी अट टाकायला लावून त्यांचा गेम केला होता. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे हे काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी, म्हणून प्रयत्नशील होते, पण काँग्रेसने त्यांचे वडील शाहू महाराजांना तिकीट दिले. या घडामोडीतही शरद पवार यांनी त्यांचा चांगलाच पोपट केला होता.
दुसरे असंतुष्ट नेते राजू शेट्टी हे हातकंणगले लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार होते, पण त्यांना उद्धव ठाकरे यांनी साफ नकार दिला. त्यामुळे त्यांनाही हात चोळत बसावे लागले. त्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला व तेही नाराज झाले. तिसरे नेते बचू कडू हे नेहमी “जेथे पारशी, तेथे सरशी,” अशा पद्धतीने वागत असल्याचे पाहून महायुती व महाविकास आघाडी या दोघांनी त्यांना फारसे महत्व दिले नाही. बचू कडू हे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कोणत्याही थराला जात असतात. मोठमोठ्या गर्जना करण्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. वेळप्रसंगी सरकारी अधिका-यांना मारहाण करण्यास ते मागे पुढे बघत नाहीत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर या महाशयांनी त्यांच्यासोबत सुरत मार्गे गोव्हाटी गाठले होते. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला मंत्रिपद मिळेल,अशा आशेवर असलेल्या बचू कडू यांच्या तोंडाला भाजपने पाने पुसली. त्यामुळे तेही असंतुष्टाच्या गोटात सामील झाले. शासकीय अधिका-यांना मारहाण करणे व आंदोलनाची नौटंकी करणारे,अशी त्यांची ओळख असून त्यांचा प्रभाव केवळ अचलपूर मतदारसंघापुरता मर्यादित आहे.
त्यामुळे ही तिसरी आघाडी या निवडणुकीत एखादं दुसरी जागा जिंकू शकेल. राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना तेवढी प्रभावी राहिलेली नाही. अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे सरकार दरबारी असलेला त्यांच्या संघटनेचा दबदबा आता उरलेला नाही. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीचे नेते,त्याना फारसे महत्व देत नाहीत.
या तिस-या आघाडी व्यतिरिक्त वंचित आघाडी व मनसे देखील रिंगणात उतरणार आहे. पण या दोन्ही पक्षाबद्दल लोकांमध्ये चांगले मत नाही. महायुतीचे “बी,” टीम अशी त्यांची ओळख आहे. मनसेचे नेते राज ठाकरे हे २५० जागा लढवणार असल्याचे सांगत असले तरी त्यांना ते शक्य होणे नाही. त्यांना यापूर्वी झालेल्या निवडणुकीत ९ % मते पडली होती, ती आता १.८५ % वर घसरली आहेत. त्यांच्याबद्दल मतदारांना विश्वास वाटत नाही. वंचित आघाडीचीही तशीच परिस्थिती पाहायला मिळते, सर्वात गोंधळलेला नेता अशी प्रकाश आंबेडकर यांची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ज्या कोलांट्या उड्या मारल्या, त्या लक्षात घेऊन महाविकास आघाडीने यावेळी त्यांना दूर ठेवले आहे. त्यांचाही पूर्वी जो ३ ते ४ % प्रभाव होता, तो केवळ १ % वर आला आहे. बचू कडू, संभाजीराजे व राजू शेट्टी हे तिघे जरांगे पाटील यांना आपल्या तिस-या आघाडीमध्ये खेचू पाहत आहेत. पण जरांगे असा घातक निर्णय घेतील, असे वाटत नाही.