Monday, June 16, 2025

Sharad Pawar : निवडणूक चिन्हासाठी पवारांची कोर्टात धाव!

Sharad Pawar : निवडणूक चिन्हासाठी पवारांची कोर्टात धाव!

सर्वोच्च न्यायालयात २५ सप्टेंबर रोजी सुनावणी


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Congress) उभी फूट झाल्यानंतर अजित पवारांकडे (Ajit Pawar) गेलेल्या घड्याळ निवडणूक चिन्हात अजूनही शरद पवार (Sharad Pawar) गटाचे मन गुंतले आहे. त्यामुळे दोन्ही गटांना तुतारी आणि घड्याळ चिन्हांऐवजी नवी चिन्हे द्यावीत या मागणीसाठी पवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


शरद पवारांची याचिका तातडीने सुनावणी होण्यासाठी सूचिबद्ध करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्या. सूर्य कांत व न्या. उज्ज्वल भूयान यांच्या खंडपीठाकडे केली होती. त्यानुसार ही याचिका २५ सप्टेंबरला सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या ६ फेब्रुवारीच्या निर्णयाला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्हे देण्यात यावीत, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली.


लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला दिलेले घड्याळ हे चिन्हवापरण्यास बंदी करावी, अशी याचिका शरद पवारगटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर १९ मार्च रोजी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले तसेच 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' हे नाव वापरण्याची परवानगी दिली होती. अजित पवार गटाने शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्रे वापरू नये, असाही आदेश न्यायालयाने दिला होता.

Comments
Add Comment