टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते सचिन व अभिनेत्री सुप्रिया यांच्या मुलीची भूमिका साकारणारी एक अभिनेत्री आहे, जिचे नाव आहे हेमल इंगळे. कोल्हापूरच्या होली क्रॉस कॉन्व्हेन्ट हायस्कूल मधून तिचे इ. ८ वीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील शांतिनिकेतन शाळेत तिचे पुढील शिक्षण झाले. पुढे तिचे १२ वीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये झाले. त्यावेळी तेथे तिने सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता. नृत्य, सूत्रसंचालन तिने केले. सांस्कृतिक कार्यक्रमात ती नेहमी अग्रेसर असायची. पुढे १२ वी नंतरचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. पदवीनंतरचे शिक्षण तिने कोल्हापूरमध्ये केले. त्यावेळी तिने ब्युटी काँटेस्टमध्ये भाग घेतला होता. काही ब्युटी काँटेस्टमध्ये ती जिंकली सुद्धा. त्यावेळी निर्माते, दिग्दर्शकाचे लक्षदेखील तिच्याकडे गेले. त्याचवेळी अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक सचिन यांनी ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटात तिला घेतले.
या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी तिला तिच्यातल्या गुणांचा शोध लागला. या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणारी ग्रास्पिंग पॉवर असल्याचे तिला जाणवले. पहिल्या चित्रपटात काम करताना ती थोडी गोंधळलेली होती; परंतु दिग्दर्शक सचिन यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे तिच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा आली. त्यांनी दाखविलेल्या विश्वासाच्या या कसोटीस ती खरी उतरली. त्यानंतर उनाड चित्रपट तिने केला. नंतर तीन ते चार मराठी चित्रपट, दोन तेलगू चित्रपट, विद्रोही नावाचा स्टार प्लस वर एक शो तिने केला, दोन-तीन वेब शो केले.
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात परत तिला अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक सचिन सोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिची श्रद्धा नावाची व्यक्तिरेखा आहे. सचिन व सुप्रियाच्या मुलीची भूमिका आहे. स्वप्नील जोशी तिचा जोडीदार असतो. चित्रपटाचे कथानक पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम हेमल व स्वप्नील जोशीच्या व्यक्तिरेखेमुळे होते. या चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान प्रत्येक कलाकारांकडून भरपूर गोष्टी तिला शिकायला मिळाल्या. या चित्रपटाचे शूटिंग गणपतीपुळे येथे झाले. इतर ठिकाणी देखील झाले. या चित्रपटातील ‘डमरू बाजे’ हे गाणे लोकप्रिय ठरले आहे. हेमल व स्वप्नील जोशी वर चित्रित झालेले साखरपुड्याचे गाणे प्रेक्षकांना आवडेल अशी तिला खात्री आहे. हा चित्रपट तिच्या जीवनातील मोठा टर्निंग पॉइंट आहे असे ती मानते. तिचे येणारे चित्रपट आहेत विकी फुल्ल ऑफ लव्ह, किर काटा किर, महापरिनिर्वाण, हेमलला तिच्या ‘नवरा माझा नवसाचा २ ‘ या चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!