फिरता फिरता – मेघना साने
स्वित्झर्लंड म्हटलं की, डोळ्यांपुढे येतात ते बर्फाच्छादित डोंगर आणि सुंदर हिरव्यागार गवतात लपेटलेली जमीन. तेथे फिरायला जायला मिळावे हे स्वप्न बहुतेकांनी मनाशी बाळगलेले असते. मात्र स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांचे स्वप्न काय असेल? या कुतूहलापोटी मी तेथील मराठी माणसांशी मैत्री केली आणि तेथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अमोल सावरकर यांच्याशी संवाद साधला. तेथील मराठी माणसे, मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी धडपडत असतात हे लक्षात आले.
स्वित्झर्लंडमधील पहिला गणेशोत्सव १९८९ साली बर्न येथे साजरा झाला. खरं तर त्यावेळी तेथे कोणतेही मराठी मंडळ स्थापन झाले नव्हते. मराठी माणसांची संख्याही तेथे फार नव्हती. भारतीय वकिलातीत कोटणीस नावाचे एक साहेब रुजू झाले होते. त्यांनी आपल्या घरात गणपती आणला आणि शहरातील मराठी मंडळींना घरी बोलावले. पूजा अर्चा केली, प्रसाद दिला. हीच स्वित्झर्लंडमधील गणेशोत्सवाची सुरूवात. त्यानंतर दरवर्षी मराठी मंडळी गणपतीला त्यांच्या घरी येत गेली. मराठी लोकांची संख्याही झुरिकमध्ये वाढत गेली. कालांतराने स्वित्झर्लंडमध्ये शंभरेक मराठी मंडळी एकत्र येऊ शकतात, हे लक्षात आल्यावर त्यांच्यातल्याच दहा- पंधरा लोकांनी पुढाकार घेऊन २००६ साली बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. मग मंडळातर्फे दिवाळी, संक्रांत, गुढीपाडवा हेही सण झुरिक येथे साजरे होऊ लागले.
स्वित्झर्लंड हा देश जरी लहान असला तरी प्रमुख शहरांमधील अंतरे तीनशे साडेतीनशे किलोमीटर असतात. यामुळे एकाच शहरात गणेशोत्सव साजरा केला, तर बाकीच्या शहरातील मंडळींना तेथे एवढा प्रवास करून येणे कठीण पडते. त्यामुळे बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे चार शहरांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असतो. या चारही शहरांमधील मराठी मंडळींमध्ये चांगला समन्वय व्हावा; म्हणून बृहन्मंडळाच्या शाखा तेथे स्थापन केलेल्या आहेत. या शाखांच्या प्रमुखांना आपापल्या शहरात मराठी सण साजरे करण्याचे नियोजनस्वातंत्र्य असते. पण बृहन्महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष मात्र एकच असतो. २०१९ पासून जिनेव्हा येथे, तर २०२३ पासून बासेल येथेही मंडळातर्फे गणेशोत्सव सुरू झाला. स्वित्झर्लंडमधील गणेशोत्सव सर्व भारतीयांसाठी खुला असतो. अमराठी भाषिक मंडळीही या कार्यक्रमांना जातात. अमोल सावरकर सांगत होते, “ऑफिसमधील ब्रिटिश किंवा फ्रेंच माणसाला जर कुतूहलापायी आमचा गणपती पाहावसा वाटला, तर त्यालाही आम्ही अगत्याने आमंत्रण देतो.”
गणेशोत्सवात गणपती स्थापनेनंतर रितसर आरती होते. पण स्वित्झर्लंडमध्ये गणेशाची पूजा सांगणारे भटजी कुठून आणणार? म्हणून नाशिकमधील एका गुरुजींशी संपर्क करून त्यांना ऑनलाईन पूजा सांगण्यासाठी विनंती केली. व्हीडिओकॉलवरून ते जसे सांगतात तशी पूजा केली जाते. प्रसादासाठी मोदक इत्यादी मात्र स्थानिक मराठी गृहिणी आनंदाने करतात. मराठी पदार्थांचे केटरिंग कॉन्ट्रॅक्ट घेणारी मंडळीही तेथे आहेत. एका महिलेने गणपतीची मूर्ती बनविण्याची कार्यशाळा छंद म्हणून काढली आहे. मुले तेथे जाऊन गणपतीची मूर्ती तयार करतात व आपापल्या घरी बसविण्यासाठी तो घेऊन जातात. गणेशोत्सवात सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. वर्षातून एकदा भारतातील कलाकारांना आमंत्रण मिळते.
स्वित्झर्लंडमधील मराठी मंडळी भारतापासून दूर असली तरी भारतीय स्वातंत्र्ययुद्धाबद्दल, क्रांतिकारकांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘भारतीय क्रांतिकारक’ या विषयावर मंडळाने व लाईन व्याख्यानमाला आयोजित केली होती. इंग्लंडचे अनिल नेने यांनी या व्याख्यानमालेत लोकांना उत्तम माहिती दिली. महिलादिनानिमित्त निवृत्त लष्कर अधिकारी तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करून तो नावारूपाला आणणाऱ्या महिलांच्या मुलाखती झाल्या. २०२०च्या जानेवारीत बृहन्महाराष्ट्र मंडळाने लौसांन, बासेल व झुरिक येथे एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. ती म्हणजे ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा! या स्पर्धेत काही खेळ आयोजित केले होते आणि बक्षीस म्हणून विजेत्या महिलांना चक्क पैठणी दिली होती. स्वित्झर्लंडमध्ये पैठणी कुठेच मिळत नाही म्हणून भारतातून येणाऱ्या काही सभासदांना गुपचूप पैठणी आणायला सांगितली होती. महाराष्ट्रातील महिलांना पैठणी मिळाल्यावर जितका आनंद होतो त्याच्या कित्येक पटींनी आनंद हातात पैठणी मिळाल्यावर स्वित्झर्लंडच्या विजेत्या मराठी महिलांना झाला होता. तसेच २०२२ च्या जानेवारीत ‘श्री तशी सौ’ ही स्पर्धा याच शहरांमध्ये आयोजित केली होती. त्यावेळीही विजेत्या दाम्पत्यांना पैठणी आणि पगडी बक्षीस म्हणून देण्यात आली.
काही वर्षांपूर्वी झुरिक येथे मराठी शाळा (मराठी भाषा शिकवण्याचे वर्ग) सुरू झाली. बासेल येथील स्थानिक मंडळींनी चक्क तेथील सरकारी शिक्षण मंडळाची परवानगी घेऊन शाळेतच मराठीचे वर्ग सुरू केले. स्वित्झर्लंडचे सरकार मुलांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देते. मराठीच्या बाबतीत प्रमाणपत्र देणारी महाराष्ट्रातील कोणती संस्था योग्य आहे हे स्विस सरकारने विचारले; म्हणून स्वित्झर्लंडच्या मराठी मंडळींनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाशी बोलणे सुरू केले आहे. त्यांचे सर्टिफिकेट असले की, येथील मराठी शिक्षणाला एक प्रकारचा दर्जा प्राप्त होईल.
१९९९ साली स्वित्झर्लंड येथे युरोपीयन मराठी संमेलन झाले होते. त्यावेळी हे बृहन्महाराष्ट्र मंडळ स्थापनही झाले नव्हते. २०१० साली बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने युरोपीयन संमेलन झाले. जर्मनी, फ्रांस, इंग्लंडबरोबरच इतरही युरोपीय देशातील मराठी मंडळीही त्यात सहभागी झाली होती. निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणाचे आयोजन केले होते. भारतातूनही काही मराठी कलाकार मंडळी आमंत्रित होती. व्यावसायिक नाटके मात्र अद्याप झुरिकमध्ये बोलवली गेली नाहीत. कारण त्यांचा खर्च फार असतो. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्यांच्या ‘वाह गुरू’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झुरिक येथे युरोपीय संमेलनात केला. तेव्हा नाटकातील दोनच कलाकार स्वित्झर्लंडला आले होते आणि दोन कलाकार ऑनलाईन जॉईन झाले. अशा प्रकारचा प्रयोगही लोकांनी आनंदाने पाहिला. तेथील लोकांची मराठी नाटकांची तहान भागवण्यासाठी अजून बरेच प्रयत्न करायला हवे आहेत.