भालचंद्र कुबल – पाचवा वेद
मराठी नाटक आणि राजकीय पार्श्वभूमी, मराठी प्रेक्षकांसाठी नवी नाही. कित्येक नाटकात कथानक म्हणून, व्यक्तिरेखा म्हणून किंवा नाटकाची पार्श्वभूमीच राजकीय ठेवून नाटके लिहिली गेली आहेत. महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या राजकीय असंतोषाची सुरुवात व मराठी नाटकाची सुरुवात जवळ जवळ एकाच वेळी झाली. महाराष्ट्रातील राजकीय चळवळ व मराठी नाट्यसृष्टी यांचा पुढील प्रवास समांतर रेषांमध्ये झाला. एकीचा दुसरीवर आणि दुसरीचा पहिलीवर सतत परिणाम होत राहिला. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने उभी राहिलेली राजकीय चळवळ इथे समाप्त झाली.
पुढे पुढे तर केवळ एखाद्या सामाजिक आशयाला पुरक ठरावे म्हणून, या राजकीय चळवळींच्या संदर्भांचा केवळ उल्लेख येण्यापर्यंत स्थिती निर्माण झाली आणि आजही ती तशीच आहे. हा विषय लेखासाठी घेण्याचे प्रमुख कारण म्हणजे निवडणुका येऊ घातल्यात आणि त्यासाठी मनोरंजन माध्यमांचा वापर सर्रास केला जातो. काही वर्षांपूर्वी धर्मवीर या चित्रपटाच्या प्रदर्शनाने राजकीय गणितं बदलण्यास मदत झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष हाती घेतल्यावर, विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टीकरण देणे गरजेचे होते. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी एखादी व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेऊन, जनतेला हिंदुत्त्वाचा जोश आणि मुळ पक्षश्रेष्ठींच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचे स्पष्टीकरण धर्मवीर या चित्रपटाने करेक्ट मांडले. आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणारे कथानक मांडण्यात चित्रपटाचे निर्माते यशस्वी देखील झाले; परंतु हिच स्ट्रॅटेजी प्रत्येक इलेक्शन कँपेनिंगबाबत उपयुक्त ठरते का? तर गेल्या किमान ५० वर्षांचा इतिहास तपासता, उत्तर नाही असेच येते. या करमणूक माध्यमांचा आणि लोकांच्या विचारसरणीचा परस्पर संबंध पूरक अशी सामाजिक परिणामकारकता दाखविणारा असेलच असे शाश्वत विधान करता येत नाही, तसे असते तर गडकऱ्यांनी ‘एकच प्याला’ लिहिल्यावर नाटकाचा परिणाम म्हणून व्यसनाधिन लोकांनी दारू सोडली असती की…! अथवा, मुलगी झाली हो…! या नाटकाचे पाच हजारांहून अधिक प्रयोग होऊन सुद्धा आज स्त्रीभृण हत्या थांबलेल्या नाहीत. थोडक्यात राजकीय कथानकाचा वापर करून तयार केली गेलेली नाट्याकृती सामाजिक परिवर्तन घडवेलच याची खात्री देत नाही.
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे देशभक्त लेखक होते. अंगी असलेल्या लेखन प्रवृत्तीला बळ देण्यासाठी टिळकांच्या केसरी दैनिकातून लिहिता लिहिता त्यांनी ‘कांचनगडची मोहना’, ‘किचकवध’, ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ ‘सं. मानापमान’ आदी रुपकात्मक नाटके लिहिली, ज्यात देशाभिमान आणि पारतंत्र्याच्या भावनेला हात घालण्यात ते यशस्वी झाले होते; परंतु वर म्हटल्याप्रमाणे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र नाटक या माध्यमाचा वापर राजकीय फायद्यांसाठी होणे थांबले. आज राजकीय चळवळीचा भाग म्हणून किंवा परिणामकारक माध्यम म्हणून “पथनाट्या”चा वापर इलेक्शन कँपेनिंगमधून प्रभावीपणे केला जातो. जनतेमध्ये थेट जाऊन निवडणूक उमेदवाराचा प्रचार, या स्थितीपर्यंत राजकीय भावना अंतर्भूत केल्याचे आपण पाहतच आहोत. मुळात नाटक हे इंटिमेट (व्यक्तिगत या अर्थी) होऊ शकते. त्यामुळे राजकीय विचारसरणीचा थेट प्रभाव ते आपल्या प्रेक्षकांवर पाडते. राजकीय संदर्भ सांगणारी नाटके मराठी नाट्यसृष्टीत अनेक आहेत. त्या नाटकांचा इतिहास मोरो शंकर रानडे यांच्या “स्थानिक स्वराज्याची वाटाघाट” या नाटकापासून सुरू होऊन कालपरवाच येऊन गेलेल्या समर खडसांच्या झुंडपर्यंत येऊन थांबतो. या प्रवासादरम्यान खरा ब्राह्मण, जग काय म्हणेल? दुसरा पेशवा, बेबंदशाही, राजसंन्यास, सं. शारदा आणि १९७०च्या पुढे सुर्यास्त, घाशीराम कोतवाल, दुसरा सामना, एक झुंज वाऱ्याशी आदी राजकीय आशय असलेल्या नाटकांनी व्यावसायिक यश मांडले. “पडघम” हे अरुण साधूंच मुक्तनाट्यं शैलीतले किंवा पथनाट्याच्या जवळ जाणारे नाटक तत्कालिक राजकीय पट मांडणारे होते.
८० च्या दशकातल्या प्रत्येक युवा नाट्यकर्मीला प्रवीण नेर्लेकरच्या भूमिकेचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले होते, अशी अनेक उदाहरणे मराठी नाटकांनी निर्माण करून ठेवली आहेत.
मराठी नाटकवाल्यांची पहिली पिढी म्हणजे इ. स. १८४३ ते १८६० पर्यंतची म्हणता येते. या कालखंडात ब्राह्मणातील वैदिक, शास्त्री, पुराणिक अशा समाजात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या वर्गाच्या हातात नाट्यसृष्टी होती. सरंजामदार, भांडवलदार मंडळीदेखील या नाट्यसृष्टीशी सलगी करीत होती.
१८६० नंतर, तर ज्याला काही कमवता येत नसे तो सरळ नाटक कंपनीत सामील होई. त्यामुळे जरी नाटक मनोरंजनाचे कार्य पूर्ण करणारे असले तरी बाळबोध स्वरुपाचे अधिक होते. मात्र पुढील पिढीस पारतंत्र्याचे चटके बसू लागले व नाटकास राजकीय पार्श्वभूमी मिळू लागली. खरं तर या विषयाचा आवाका प्रचंड आहे, एवढ्या कमी शब्दात तो मांडता येणार नाही; परंतु धर्मवीर-२ हा राजकीय पटलावर यशस्वी ठरलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलने मराठी नाट्यसृष्टी आणि राजकीय पार्श्वभूमीबाबत मत व्यक्त करणे गरजेचे होते, म्हणून हा लेखनप्रपंच..!