Saturday, October 18, 2025
Happy Diwali

मराठा व ओबीसी आंदोलक आमने-सामने

मराठा व ओबीसी आंदोलक आमने-सामने

दीपक मोहिते

अंबड : अंबड तालुक्यातील वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आज समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिसांनी या परिसरात अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.अंतरवली सराटी गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर वडीगोद्री या गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक आज समोरासमोर आले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. मराठा आंदोलक शहागडमार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार असून पोलीसानी या मार्गावर बंदोबस्त वाढवला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी प्रकृती बिघडल्याने मराठा समाजाचे अनेक आंदोलक अंतरवली सराटीत दाखल होत आहेत.अंतरवली सराटीत जाण्यासाठी लक्ष्मण हाके यांचं जेथे उपोषण सुरु आहे, त्या भागातून हा रस्ता जातो. त्यामुळे मराठा आंदोलकांच्या शेकडो गाड्या या रस्त्यावरून जात आहेत. त्यामुळे दोन्ही समाजाच्या आंदोलकांमध्ये तेथे चिथावणीखोर घोषणाबाजी होत आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.बीडमध्ये झालेल्या घटनेनंतर पोलिस समंजस भूमिका घेत, दोन्ही बाजूच्या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान घनसावंगी तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली.

वडीगोद्री येथून मनोज जरांगे यांच्या आंदोलकांच्या दिशेला गाड्या जात होत्या. त्याच दरम्यान आमच्या गाड्या सोडत नाहीत आणि त्यांच्या गाड्या का सोडतात? या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा आंदोलक समोरासमोर आले. प्रा. लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्या दोघांचे उपोषणस्थळे एकमेकांच्या जवळ असल्यामुळे दोन्ही समाजाचे आंदोलक तेथे जमा होत आहेत.अनेक वेळा कार्यकर्ते आमनेसामने आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हजारो पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण परिसरात लावण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >