कोलकाता : पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या विरोधात ४२ दिवसांपासून आंदोलनरत असलेल्या डॉक्टरांनी तुर्तास संप मागे घेतला आहे. परंतु, ७ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा काम बंद केले जाईल असा इशारा दिलाय.
पश्चिम बंगालमध्ये, कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी ज्युनियर डॉक्टरांनी शनिवारी आपला निषेध संपवला आणि कामावर परतले. तब्बल ४२ दिवसांच्या आंदोलनानंतर डॉक्टरांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला. ज्युनियर डॉक्टरांनी फक्त इमर्जन्सी ड्युटीसाठी परतण्याचे मान्य केले आहे, ओपीडी अजूनही बंद राहणार आहे.
आंदोलन करणारे कनिष्ठ डॉक्टर अनिकेत महतो म्हणाले की, आम्ही पुन्हा कर्तव्यावर परतलो आहोत. आमचे सहकारी आपापल्या विभागात परतले आहेत. आम्ही आज सकाळी फक्त अत्यावश्यक आपत्कालीन सेवांसाठी आलो आहोत, ओपीडीमध्ये नाही. कृपया हे विसरू नका की आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे इतर सहकारी आधीच राज्यातील पूरग्रस्त भागात रवाना झाले आहेत, जिथे ते सुरू असलेल्या निषेधांमध्ये सार्वजनिक आरोग्याप्रती त्यांची बांधिलकी दर्शविण्यासाठी अभय क्लिनिक्स (वैद्यकीय शिबिरे) सुरू करतील असे त्यांनी सांगितले. दरम्यान मृत डॉक्टरांना न्याय मिळावा आणि राज्याच्या आरोग्य सचिवांना हटवावे या मागण्या प्रशासनाकडून पूर्ण करण्यासाठी पुढील ७ दिवस वाट पाहणार असल्याचे आंदोलक डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते पुन्हा एकदा काम बंद आंदोलन करणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये ९ ऑगस्टपासून डॉक्टरांची निदर्शने सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे. आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये एका ज्युनियर डॉक्टरसोबत क्रूरतेची घटना ९ ऑगस्ट रोजी घडली होती. मृत हा मेडिकल कॉलेजच्या चेस्ट मेडिसिन विभागाचा पदव्युत्तर द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर होता. ८ ऑगस्ट रोजी ड्युटी संपवून रात्री १२ वाजता मित्रांसोबत जेवण केले. तेव्हापासून महिला डॉक्टरचा पत्ता नव्हता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमधून डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने वैद्यकीय महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मृताचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात महिला डॉक्टरसोबत बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. कनिष्ठ महिला डॉक्टरचा मृतदेह गादीवर पडलेला असून गादीवर रक्ताचे डाग आढळून आले. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात मृत महिला डॉक्टरच्या तोंडावर आणि दोन्ही डोळ्यांवर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रायव्हेट पार्टवर रक्ताच्या खुणा आणि चेहऱ्यावर नखांच्या खुणा आढळल्या. ओठ, मान, पोट, डावा घोटा आणि उजव्या हाताच्या बोटावर जखमेच्या खुणा होत्या.