नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या (Saptashrungi Devi) दर्शनासाठी (Darshan) नेहमीच भाविकांची मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळते. अशातच येत्या नवरात्रोत्सवात (Navratri) देशभरातून लाखो भाविकं वणी येथे येतात. या काळात भाविकांची मोठी संख्या पाहता त्या पार्श्वभूमीवर सप्तशृंग निवासिनी ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या आधारे नवरात्रोत्सव काळामध्ये भाविकांना सप्तश्रृंगी देवीचे दर्शन सुलभरित्या मिळू शकणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गत वर्षी प्रमाणे यंदाही शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत यांच्या बैठकीमध्ये गर्दीचं नियोजन आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. याबाबत उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आली असून यंदाही ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान नऊ दिवसांसाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. नवरात्रौत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
खासगी वाहतूक बंद
नवरात्रौत्सवात मंदिरासह गडावर देवीच्या मंदिरात जाणारी फनिक्युलर ट्रॉली देखील २४ तास कार्यान्वित असणार आहे. मंदिर गाभाऱ्यात फनिक्युलर ट्रॉलीने येणाऱ्या भाविकांना ३० टक्के तर पायरीने येणाऱ्या भाविकांना ७० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु नवरात्रौत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडादरम्यान खासगी वाहतूक देखील बंद राहणार आहे. १०० एसटी बसेसच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंगी गड भाविकांची वाहतूक करण्याचं नियोजन आहे.