दीपक मोहिते
विरार : १३३, वसई विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी दिल्लीत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, त्यांच्या उमेदवारीसाठी एका माजी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी शिफारस केली आहे. या माजी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला गांधी कुटुंबात वजन असल्यामुळे विजय पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.
विजय पाटील यांनी २०१९ साली निवडणूक लढवली होती. त्यावेळी झालेल्या सरळ लढतीत त्यांचा पराभव झाला होता, पण समोर आ. हितेंद्र ठाकुर यांच्यासारखा दिग्गज उमेदवार असताना त्यांनी ७६ हजार ९५५ मताचा पल्ला गाठला होता. तत्पूर्वी २०१४ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मायकल फुर्टडो याना केवळ १६ हजार ४६७ मते पडली होती. त्यानंतर २०१९ साली विजय पाटील यांना त्यांच्यापेक्षा अधिक ६० हजार मते मिळाली होती. त्यामुळे यंदा त्यांच्याच नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे प्रचंड आर्थिक व मनुष्यबळ आहे, त्यांची ही बाजू त्यांना उमेदवारी मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरणारी आहे.
काँग्रेसतर्फे त्यांना उमेदवारी मिळाल्यास बविआचे आ. हितेंद्र ठाकूर हे हमखास निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. एकेकाळी घनिष्ठ मित्र असलेले या दोघांमधून सध्या विस्तव जात नाही. पण विजय पाटील यांचा पराभव करण्याची संधी आ.ठाकूर सोडतील, असे वाटत नाही.