दीपक मोहिते
पालघर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) वारे वेगाने वाहू लागले आहेत. पालघर (Palghar) जिल्हा त्याला अपवाद नाही. कारण जिल्हा, तालुका व स्थानिक पातळीवर पदाधिकारी,कार्यकर्ते व बुथ प्रतिनिधींच्या बैठकांना वेग आला आहे. भाजपने (BJP) आपल्या घटक पक्षातील (शिंदे गट) काही पदाधिकाऱ्यांची समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त्या करून तिरकी चाल खेळण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी ज्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधले होते,अशांची समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त्या करून त्यांचा पत्ता कट केला आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या वैदेही वाढाण यांची अनु.जाती-जमाती समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करणे,हा त्याचाच एक भाग आहे.या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या,पण त्यांचे स्वप्न भाजपच्या अशा खेळीमुळे भंगले गेले आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम ( शिंदे गट ) यांचीही भाजपने गठडी वळली आहे.
या मतदारसंघाचे विद्यमान आ.श्रीनिवास वनगा,यांची आमदार म्हणून कारकीर्द नाममात्र राहिल्यामुळे त्यांचाही अशाच पद्धतीने पत्ता साफ करण्यात येणार आहे.या जागेवर भाजपचा डोळा असून ती हिसकावून घेण्यासाठी भाजप सध्या निरनिराळे हातखंडे वापरत आहे.पालघर विधानसभा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून ते सेनेच्या ( उबाठा ) ताब्यात जाऊ नये,यासाठी भाजप ही जागा स्वतःकडे खेचून घेण्याच्या तयारीत आहे. पालघरवासीय हे कायम उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तसेच पक्षफुटीमुळे त्यांच्या सहनुभूतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, त्यांच्या तुलनेत शिंदे गटाला चमकदार कामगिरी करू शकणार नाही, हे त्यांच्या पक्षातर्फे करण्यात आलेल्या सर्व्हेतून स्पष्ट झाल्यामुळे भाजपने इच्छुक उमेदवारांना चिरीमिरी पदे देऊन त्यांना इच्छुकांच्या रांगेतून बाहेर काढले आहे. निवडणुका जिंकेल, असा एकही चेहरा शिंदे गटाकडे नसल्यामुळे भाजप आता ही जागा स्वतःकडे खेचून घेण्याच्या कामाला लागला आहे.
या मतदारसंघात शिवसेना ( उबाठा ) व भाजप अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे.येथील निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे आपले सर्वस्व पणाला लावतील.