भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने टोकाचे पाऊल
अमरावती : अमरावतीमधील उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांच्या समक्ष त्यांच्या कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन करून एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी साडेतीन वाजता घडली. अनेक दिवसांपासून शेती अधिग्रहणाचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. दिलीप तुळशीराम ढगे (५२, रा. उजोना, ता. दारव्हा) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिलीप ढगे यांच्यासह एकूण १४ वारसांच्या नावावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड येथील ६.७४ हेक्टर आर शेत जमीन चांदी नदी प्रकल्पाकरिता संपादित केली आहे. परंतु, या प्रकरणात आपसी विवादामुळे संबंधित भूधारकांना मोबदल्याची रक्कम देण्यात आली नव्हती. मात्र, सर्व व्यवस्थित झाल्यानंतर जमिनीच्या भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम मिळण्यासाठी रामकृष्ण ढगे वारंवार चकरा मारूनही समाधानकारक उत्तर नाही १६ ऑगस्टला उपविभागीय अधिकाऱ्यांनी आवश्यक दस्तावेजांसह शेतजमिनीशी संबंधितांना बोलावले होते. आम्ही सर्व एसडीओ कार्यालयात हजर होतो. मात्र, एसडीओ कोरे कार्यालयात नसल्याने सुनावणी झाली नाही. त्यानंतरही दिलीप ढगे व इतरांनी सुनावणीच्या तारखेसाठी वारंवार एसडीओ कार्यालयात चकरा मारल्या. याप्रकरणी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दिलीप ढगे यांनी टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती दिलीप ढगे यांचे बंधू जगदीश ढगे यांनी दिली.
कागदपत्रांचा अभाव होता
ईलेक्शन ड्युटीवर असलेल्या एका स्थानिक नायब तहसीलदारांचा अपघात झाल्यामुळे मी रुग्णालयात गेले होते. त्यामुळे सुनावणीला हजर राहू शकली नाही. मात्र, त्यांच्या प्रकरणात मूळ कागदपत्रांचा अजूनही अभाव आहे, असे चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी सांगितले.