चंद्राबाबूंच्या आरोपांची केंद्राकडून गंभीर दखल
नवी दिल्ली : तिरुपती (Tirupati Balaji) देवस्थानातील प्रसादाच्या लाडूंमध्ये (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याच्या गंभीर आरोप करण्यात आला आहे. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी आणि इतर कमी दर्जाच्या घटकांच्या कथित वापरासंदर्भात अहवाल मागवला आहे.
तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावर केला आहे. दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पण यावरुन आंध्र प्रदेशात वाद पेटला आहे.
जेपी नड्डा यांच्याकडून कारवाईचा इशारा
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी याबाबत माहिती मिळाल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. नेमके काय झाले आहे? याबाबत त्यांच्याकडून तपशील जाणून घेतला. मी त्यांना उपलब्ध असलेला अहवाल देण्यास सांगितले आहे; जेणेकरून आम्ही त्याचे परीक्षण करू. मी राज्यातील नियामकांशीही बोलू. नियामक आणि अन्न सुरक्षा मानकांनुसार योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अहवालाची सखोल परीक्षण करेल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल, असेही जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.
‘अन्नदानम’चा दर्जा खालावल्याचा आरोप
मागील ५ वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत होता तेव्हा त्यांनी देवस्थानचे पावित्र्य घालवले. ‘अन्नदानम’ अर्थात अन्नदानाच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला, असा आरोप नायडू यांनी केला आहे.